उमेश गायगवळे, मुंबई
मुंबई ही कधी झोपत नाही, असे म्हटले जाते. पण या न झोपणाऱ्या शहराची धडधड जर कुठे ऐकू येत असेल, तर ती लोकल रेल्वेच्या रुळांवर आणि बेस्ट बसच्या चाकांमध्ये. रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी असेल, तर बेस्ट बस ही या महानगराची रक्तवाहिनी आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या रक्तवाहिनीतच अडथळे निर्माण झाले आहेत, अशी भावना प्रवाशांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. बसस्टॉपवर अर्धा ते एक तास ताटकळत उभे राहणारे विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला, यांच्या चेहऱ्यावरचा त्रास आज सर्वत्र दिसतो.

एकेकाळी २०२२ साली बेस्टच्या ताफ्यात सुमारे दोन हजारांच्या घरात बसेस कार्यरत होत्या. त्यानंतर कोरोनानंतरच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली. अनेक डिझेल बस या १५ वर्षांपेक्षा जुन्या झाल्याने नियमांनुसार बाद करण्यात आल्या. परिणामी मोठ्या प्रमाणावर बसेस भंगारात गेल्या. त्या जागी तितक्याच वेगाने नवीन बसेस दाखल होऊ शकल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. २०२५ पर्यंत बेस्टने नव्याने सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेसची खरेदी सुरू ठेवली असली, तरी शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत हा ताफा अद्याप अपुरा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोरोना काळाने बेस्टला आर्थिकदृष्ट्या हादरा दिला. प्रवासी संख्या घटली, उत्पन्न कमी झाले आणि प्रशासनाने खर्चकपातीचा मार्ग स्वीकारला. त्यातच कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) योजनेचा पर्याय देण्यात आला. अनेकांनी ती स्वीकारली, तर काही अजूनही कार्यरत आहेत. परिणामी चालक-वाहकांची संख्या घटली आणि काही मार्गांवरील फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली.

दरम्यान, बेस्टने खाजगीकरणाचा मार्ग स्वीकारला. काही मार्गांवर कंत्राटी तत्त्वावर बसेस धावू लागल्या. प्रशासनाच्या मते यामुळे खर्च नियंत्रणात आला, ताफ्याचे आधुनिकीकरण झाले आणि नफ्यात वाढ झाली. भाडेवाढीनंतर प्रवासी संख्या काही प्रमाणात कमी झाली असली, तरी आर्थिक शिस्त आणि जाहिरातींचे उत्पन्न यामुळे बेस्टचा नफा वाढल्याचे सांगितले जाते. मात्र प्रश्न असा आहे की, नफ्याच्या गणितात प्रवाशांच्या सोयीला दुय्यम स्थान तर मिळत नाही ना?
नव्याने दाखल झालेल्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. वातानुकूलित (AC) बसेस, स्वच्छता, आरामदायी आसनव्यवस्था, कमी आवाज, प्रदूषणमुक्त प्रवास, या सुविधा मुंबईकरांसाठी अभिमानास्पद आहेत. बेस्ट ॲपमुळे बस कुठे आहे, किती वेळात येईल याची माहिती प्रवाशांना मोबाईलवर मिळते. काही नव्या बसस्टॉपवर मोबाईल चार्जिंग पॉइंटची सुविधा देण्यात आली आहे. आधुनिकतेकडे टाकलेले हे पाऊल निश्चितच सकारात्मक आहे.

मात्र या सगळ्या सोयी असूनही मूलभूत प्रश्न कायम आहे. बसेसची संख्या, मुंबई आणि उपनगरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत फेऱ्या कमी झाल्याचे चित्र दिसते. पूर्वी ५ ते १० मिनिटांच्या अंतराने येणारी बस आज २० ते ३० मिनिटांनी येते. काही ठिकाणी तर तासभर प्रतीक्षा करावी लागते. शाळा-कॉलेजच्या वेळेत विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यासाठी धावपळ करावी लागते. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि दिव्यांग प्रवाशांना या गर्दीतून मार्ग काढणे अधिकच कठीण होते.
बसस्टॉपच्या बाबतीतही प्रवाशांत नाराजी आहे. काही ठिकाणी उभारलेले आकर्षक शेड्स आणि जाहिरातींचे फलक दिसतात; पण उन्हाळ्यात ऊन आणि पावसाळ्यात पावसापासून संरक्षण अपुरे पडते. बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नाही, ही तक्रार वारंवार ऐकू येते. “हे बसस्टॉप जाहिरातीसाठी की प्रवाशांसाठी?” असा संतप्त सवाल नागरिक विचारताना दिसतात.

मुंबईची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. उपनगरांचा विस्तार, नवीन व्यावसायिक केंद्रे, मेट्रो मार्गांचे जाळे, या सर्वांमुळे बससेवेची गरज अधिक वाढली आहे. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी जोडणाऱ्या ‘फीडर बस’ची संख्या वाढवणे ही काळाची गरज आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या बसेसची संख्या वाढवून कामगार आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे.
पर्यावरणपूरक धोरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसेस हा योग्य मार्ग आहे; मात्र त्यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधा, देखभाल व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांचीही तितकीच गरज आहे. फक्त ताफा आधुनिक करून उपयोग नाही, तर तो पुरेशा संख्येने रस्त्यावर धावला पाहिजे.
नव्याने महापालिकेत सत्तेत आलेल्या सरकारसमोर मोठे आव्हान उभे आहे. आर्थिक शिस्त राखत असतानाच प्रवाशांची गैरसोय दूर करणे, महत्त्वाच्या मार्गांवर फेऱ्या वाढवणे, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलतींचा पुनर्विचार करणे, बसस्टॉपची सुविधा सुधारणा, या बाबींकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
मुंबईकरांसाठी बेस्ट ही केवळ वाहतूक सेवा नाही, तर रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. लोकल रेल्वे जशी शहराची जीवनवाहिनी आहे, तशीच बेस्ट बस ही प्रत्येक गल्लीबोळाला जोडणारी रक्तवाहिनी आहे. या रक्तवाहिनीत अडथळे निर्माण झाले, तर शहराची गती मंदावेल.

आधुनिकतेचा वेग, नफ्याचे गणित आणि जाहिरातींचा झगमगाट यापलीकडे जाऊन बेस्टने पुन्हा एकदा “जनतेची बस” म्हणून आपली ओळख मजबूत करणे आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि प्रवाशांच्या अपेक्षा लक्षात घेता, मुंबईत बस वाढवण्याची वेळ आता आली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातून विशेषतः कांदिवली, बोरिवली, मालाड जोगेश्वरी अंधेरी सांताक्रूझ, खार, वांद्रे या भागातील प्रवासी, नोकरवर्ग मुंबई शहरातील दादर, परळ, लालबाग, लोअर परेल भायखळा, वरळी या भागात मोठा नोकरवर्ग ये जा करतो.
त्याच बरोबर पुर्व उपनगरातील मुलूंड ते सायन दरम्यानच्या प्रवाशांची मोठी संख्या आहे.
नफा आणि आधुनिकीकरण या दोन्हींचा संतुलित समन्वय साधला, तरच बेस्ट खऱ्या अर्थाने सक्षम होईल. अन्यथा, चमकदार बस आणि आकर्षक शेड्स यांच्या आड दडलेली अस्वस्थता वाढतच राहील.
मुंबईची रक्तवाहिनी धाप लागलेली आहे. तिला केवळ आधुनिकतेची नव्हे, तर संख्येची, संवेदनशीलतेची आणि दूरदृष्टीची गरज आहे. प्रशासनाने हा संदेश ओळखला, तरच शहराचा वेग कायम राहील; अन्यथा बसस्टॉपवर उभा असलेला प्रवासीच या व्यवस्थेवर अंतिम निर्णय देईल.
प्रश्न फक्त इतकाच, मुंबईकरांची ही आर्त हाक प्रशासनापर्यंत पोहोचेल का? आणि नव्या सरकारकडून बेस्टच्या चाकांना पुन्हा वेग मिळेल का?
उत्तर येणारा काळच देईल.


