पुणे प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असून सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट यांनी दिली. पवार यांचे सर्व जीवनावश्यक घटक (वायटल पॅरामीटर्स) सामान्य मर्यादेत असून त्यांची एकूण क्लिनिकल स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयात दाखल होताना पवार यांच्या छातीत कोंजेशन आढळून आले होते. त्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असून प्रकृतीत अपेक्षित सुधारणा दिसून येत आहे, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
अलीकडील काळातील व्यापक दौरे, सातत्याने प्रवास आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे आलेला शारीरिक ताण व थकवा ही प्रकृती बिघाडामागील कारणे असावीत, असे वैद्यकीय सूत्रांचे मत आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून नियमित तपासण्या केल्या जात आहेत.
सध्याच्या प्रकृतीचा आढावा घेता, पुढील दोन दिवसांत पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि, अंतिम निर्णय त्यांच्या प्रकृतीतील पुढील प्रगतीनुसार घेतला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीबाबत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून चौकशी केली जात असून लवकर बरे व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


