पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार जिल्हा परिषदेतील ७३ जागांपैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी तब्बल २७ जागांवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
इंदापूर आणि बारामती तालुक्यांतील काही निकाल अद्याप प्रलंबित असले, तरी मावळ, जुन्नर, आंबेगाव, खेड, दौंड, पुरंदर, भोर आणि वेल्हे या भागांत राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेले यश निर्णायक ठरत आहे. विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रवादीची संघटनात्मक पकड आणि स्थानिक नेतृत्वाचे प्रभावी जाळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भाजपला धक्का; काँग्रेसचे खातेही उघडले नाही
या निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आलेले नाही. आतापर्यंत भाजपच्या पदरात केवळ ६ जागा पडल्या आहेत. शिवसेनेला (शिंदे गट व ठाकरे गट मिळून) ३ जागा, तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला केवळ १ जागेवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला अद्याप एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही, ही बाब महाविकास आघाडीच्या दृष्टीने चिंतेची ठरत आहे.
तालुकानिहाय चित्र
जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बहुसंख्य जागांवर बाजी मारली. डिंगोरे, ओतूर, बोरी बु., बारव या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. आंबेगाव तालुक्यातही पारगाव तर्फे अवसरे, शिनोली, अवसरी बु. येथील निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागले. मावळ तालुक्यात तर राष्ट्रवादीने अक्षरशः स्वीप करत टाकवे बु., इंदुरी, खरकाळे, कुसगाव बु. आणि सोमटणे या सर्व जागा जिंकल्या.
खेड, दौंड, पुरंदर, भोर आणि वेल्हे तालुक्यांतही राष्ट्रवादीची कामगिरी भक्कम राहिली. बारामती आणि इंदापूरमधील अंतिम निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, तेही राष्ट्रवादीच्या बाजूने गेल्यास एकहाती सत्ता निश्चित होण्याची शक्यता आहे.
विजयी उमेदवारांची यादी (आतापर्यंत)
जुन्नर:
डिंगोरे – सोनाबाई दाभाडे (रा.काँ.), ओतूर – छाया तांबे (रा.काँ.), बोरी बु. – कल्पना काळे (रा.काँ.),
आळे – मंगेश काकडे (शिवसेना), राजुरी – स्मिता कणसे (शिवसेना–शिंदे),
सावरगाव – गुलाबराव पारखे (शिवसेना–ठाकरे), बारव – मोनाली लांडे (रा.काँ.),
नारायणगाव – नेहा पाटे (शिवसेना)
आंबेगाव:
पारगाव तर्फे अवसरे – विवेक वळसे (रा.काँ.), कळंब – प्रीती थोरात (रा.काँ.–शरद पवार),
शिनोली – शीला लोहकरे (रा.काँ.), अवसरी बु. – विष्णु हिंगे (रा.काँ.),
घोडेगाव – सुवर्णा दरेकर (शिवसेना)
मावळ:
टाकवे बु. – अनंता पावसे, इंदुरी – पल्लवी दाभाडे, खरकाळे – दीपाली हुलावले,
कुसगाव बु. – संतोष राऊत, सोमटणे – मनीषा मुरे (सर्व रा.काँ.)
इतर तालुके:
खेड – गणेश बोत्रे, सुनिता बुट्टे पाटील (रा.काँ.)
दौंड – वीरधवल जगदाळे, तुषार थोरात (रा.काँ.)
पुरंदर – रुपाली झेंडे, प्राजक्ता दुर्गाडे (रा.काँ.)
वेल्हे – अमोल नलावडे, तानाजी मांगडे (रा.काँ.)
बारामती – पल्लवी खेत्रे, शुभांगी शिंदे (रा.काँ.)
इंदापूर – मेघना बंडगर, सोनाली जाधव (रा.काँ.)
सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा
एकूण निकालांचा कल पाहता, पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘दबदबा’ पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. उर्वरित निकाल जाहीर होताच सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


