मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात भावनिक आणि ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रवेश करताच त्यांनी खुर्चीला आणि टेबलाला नमस्कार करत आदरांजली अर्पण केली. हा क्षण पाहून उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या दालनात सुनेत्रा पवारांचा प्रवेश हा केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय वारशाचा भावूक क्षण ठरला.
पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी कार्यभारासाठी आशीर्वाद घेतले.
सकाळी अकराच्या सुमारास त्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाल्या. दालनात ठेवलेली खुर्ची पाहताच त्या काहीशा भावूक झाल्या. आपल्या पतीच्या रिक्त झालेल्या जागेवर बसताना त्यांनी संयम राखण्याचा प्रयत्न केला; मात्र वातावरणातील भावुकता लपवता आली नाही.
हा प्रसंग पाहून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. आईला या जबाबदारीच्या भूमिकेत पाहून ते भावूक झाल्याने सभागृहात काही काळ शांतता पसरली होती.
दरम्यान, मंत्रालयात जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सुनेत्रा पवार यांनी छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील आणि नवाब मलिक यांच्यासोबत बैठक घेत आगामी राजकीय आणि प्रशासकीय रणनीतीवर चर्चा केली.
पदभार स्वीकारल्यानंतर आजच सुनेत्रा पवार त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या विकासकामांना गती देणे आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, हेच आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सूचित केले.


