मुंबई प्रतिनिधी
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी शनिवारी सुरू झाली. सकाळी ११ वाजेपर्यंतच्या प्राथमिक कलानुसार जिल्हा परिषदांच्या ७३१ जागांपैकी सुमारे २०० जागांचा कल स्पष्ट झाला असून, त्यामध्ये महायुतीला आघाडी मिळाल्याचे चित्र आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कामगिरीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांमध्ये झालेल्या या निवडणुकांसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदांच्या ७३१ आणि पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले होते.
प्राथमिक कलानुसार भाजप ७० जागांवर आघाडीवर असून, शिवसेना (शिंदे गट) ३८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४३, काँग्रेस २१, शिवसेना (ठाकरे गट) १४, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ३, तर अन्य ११ जागांवर आघाडीवर आहेत. या आकडेवारीनुसार महायुतीचे वर्चस्व दिसून येत असले, तरी काही जिल्ह्यांत लढत अद्याप अटीतटीची आहे.
दरम्यान, कोकणात महायुतीने बिनविरोध विजयांची मालिका नोंदवली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत ८, तर पंचायत समितीत १७ जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या. ५० सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ आणि शिवसेना (शिंदे गट)चा एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. पंचायत समितीतील १०० जागांपैकी भाजपचे १६ आणि शिंदे गटाचा एक सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही शिवसेनेच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय झाला. महाड पंचायत समितीतील सवाने-धामणे गणातून उभे असलेले अनिल जाधव तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज गणातून शिवसेना (शिंदे गट)च्या डॉ. पद्मजा कांबळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांत अंतिम चित्र स्पष्ट होणार असून, या निकालांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


