पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साहित्य संवर्धन आघाडीने मंगळवारी आपला वचननामा जाहीर करत साहित्य व वाचन चळवळ अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले. परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना शासनमान्यता मिळवण्यासाठी पाठपुरावा, साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, तसेच आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन व इतर उपक्रमांसाठी अत्यल्प शुल्कात सभागृह उपलब्ध करून देण्याची ग्वाही वचननाम्यात देण्यात आली आहे.
या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत आघाडीचे उमेदवार योगेश सोमण, स्वाती महाळंक आणि प्रदीप निफाडकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याची टीका करत, घटनात्मक चौकटीत, पारदर्शक आणि सदस्याभिमुख कारभार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
योगेश सोमण म्हणाले, “दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना व्यासपीठ दिले जाईल. युवा लेखकांसाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जातील.”
‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी भाषिकांना साहित्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून साहित्यनिर्मितीला चालना देणे, तसेच परप्रांतीयांमध्ये मराठीबद्दल आस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रदीप निफाडकर यांनी परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनावर भर देताना उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “जिल्हा शाखा सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक अर्थसाहाय्य देण्यात येईल. या निधीतून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातील,” असे ते म्हणाले.
दरम्यान, ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही वचननाम्यात देण्यात आले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्या दर्जाला साजेसे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही नमूद करण्यात आले.
‘१०० पुस्तक महोत्सवांचे’ आयोजन
पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा उल्लेख करत, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परिषदेच्या कार्यक्षेत्रात ‘१०० पुस्तक महोत्सवां’चे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती सोमण यांनी दिली.
दरम्यान, “हे पॅनल कोणत्याही संघटनेचे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पुरस्कृत नाही. समविचारी साहित्यप्रेमी एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत,” असेही सोमण यांनी स्पष्ट केले.


