
सोलापूर:प्रतिनिधी
ल्ह्याच्या ग्रामीण भागात चार हजार ७८ तर शहरातील ५०२ जणांकडे शस्त्र परवाने आहेत. जिल्ह्यातील तेवढ्या व्यक्तींना खरोखर शस्त्राची (बंदूक तथा पिस्टल) गरज आहे का, याच्या पडताळणीचे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या ज्या परवानाधारकांनी शस्त्र नेले नाही, अशा १३२५ जणांचे परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यावर जानेवारीअखेर निर्णय अपेक्षित आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गरजूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून शस्त्र परवाना दिला जातो. तर शहरी भागातील अर्जदार व्यक्तींना पोलिस आयुक्तांकडून शस्त्र परवाना मिळतो. पण, बीडमध्ये परवान्याच्या शस्त्राचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना सध्या खरोखर शस्त्राची गरज आहे का, त्यांचे वय सध्या किती आहे आणि ते शस्त्र चालविण्यासाठी सक्षम आहेत का, त्यांचा सध्याचा व्यवसाय, त्यांना असलेला संभाव्य धोका, अशा सर्व बाबींची पडताळणी तालुक्यातील पोलिसांमार्फत केली जात आहे. दरम्यान, नव्याने परवाना मागणाऱ्यांच्या अर्जाची काटेकोर पडताळणी केली जात आहे.