मुंबई प्रतिनिधी
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खांदेपालट सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सोमवारी चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेत हालचालींना वेग आला आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने सातत्याने बदल्यांचे निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर आता आणखी चार बड्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना करण्यात आल्या आहेत. शासनाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध केले.
नवीन आदेशानुसार, श्रीधर दुबे यांची महाराष्ट्र सहकारी विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करून त्यांची अन्न व औषध प्रशासन, मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सत्यजीत बाडे, जिल्हा परिषद रायगड येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, यांची अपंगत्व विभाग, पुणे येथे आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
डॉ. सुनील भोक्रे, महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक, यांची शहरी आरोग्य विभाग, मुंबई येथे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर राहुल कुलकर्णी, गृह विभाग (मंत्रालय) येथील संयुक्त सचिव, यांची महाराष्ट्र सहकारी विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीही दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. ज्येष्ठ सनदी अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर यांची मंत्रालयात अपर मुख्य सचिव (गृह) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. आय. एस. चहल (भाप्रसे) यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील हे बदल आगामी काळात अधिक प्रभावी आणि शिस्तबद्ध कारभारासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.


