मुंबई प्रतिनिधी
शिक्षकी पेशाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व अधोरेखित करत समाजातील समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी लोकसंघ – सोशल एज्युकेशन मुव्हमेंट (SEM), मुंबई युनिटच्या वतीने चौथ्या वार्षिक ‘आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महामाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त हा गौरव सोहळा ३१ जानेवारी २०२६ रोजी दादर-माटुंगा कल्चरल हॉल, दादर (मुंबई) येथे उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयोजक सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
विचारपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे कुलदीप रामटेके (B.E. – सिव्हिल इंजिनिअर) यांचे स्वागत रोहिणी सुमित माटे यांनी, तर उमेश बाबू (बजेट स्पेशलिस्ट) यांचे स्वागत उज्वला जितेंद्र सोनारकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गजानन डोंगरे (चेतना कॉलेज) यांचे स्वागत नीलम श्याम शिरसाठ यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन केले.
प्रास्ताविकातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित
प्रास्ताविकात श्री. सुनील कदम यांनी शिक्षणाच्या अधिकारामुळेच आजचा समाज घडला असल्याचे नमूद केले. “आपल्या भौतिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीच्या मुळाशी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य आहे. दर्जेदार शिक्षणामागे गुरुजनांचे योगदान विसरता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक समाजाचा कणा – कुलदीप रामटेके
प्रमुख पाहुणे कुलदीप रामटेके यांनी शिक्षक हे समाजाचे कणा असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या युगातही शिक्षकांचे स्थान अढळ असल्याचे नमूद करत त्यांनी मोबाईलपेक्षा पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी इंग्रजी माध्यमातील शिक्षण उपयुक्त ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच ‘२५१ स्टडी सिक्रेट्स’ हे पुस्तक पालक व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.
बजेटविषयी जनजागृतीची गरज – उमेश बाबू
बजेट स्पेशलिस्ट उमेश बाबू यांनी अर्थसंकल्प व आर्थिक नियोजनाबाबत समाजात अधिक जनजागृती होण्याची गरज असल्याचे सांगितले.
सावित्रीबाई फुले – खऱ्या अर्थाने मानकरी
अध्यक्षीय भाषणात प्रा. गजानन डोंगरे यांनी लोकसंघ–SEM च्या कार्याचा आढावा घेतला. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले मूलभूत कार्य, विधवांसाठीचे योगदान, आरोग्यसेवा आणि मुलींसाठीची पहिली शाळा यांचा उल्लेख करत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात काहीही गैर नाही, असे मत त्यांनी मांडले. आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
पुरस्कार वितरण
यंदा मुंबई व परिसरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील प्रत्येकी एक शिक्षक व शिक्षिका यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मानपत्र, ट्रॉफी आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार स्वीकारताना डॉ. गायत्री बच्चाव यांनी मनोगतात लोकसंघ–SEM चे आभार मानले.
याशिवाय ‘उत्कृष्ट प्रेरणादायी नेतृत्व पुरस्कार’ न्यू इंग्लिश स्कूल (आय.ई.एस.), बांद्रा येथील मुख्याध्यापिका श्रीमती पूर्वा सावंत यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या शाळेतील सहा शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी नामांकन करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला.
समारोप
समारोपप्रसंगी शशांक शेंडगे यांनी उपस्थित शिक्षक, प्रमुख पाहुणे, सेम कल्याण युनिट तसेच कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. विशेष उपस्थिती दर्शविणाऱ्या आरसीएफच्या चीफ मेडिकल ऑफिसर रेखा देवाडिगा (डीजीएम) आणि भाग्यश्री कापुरे (वैद्यकीय समन्वयक) यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालक संगीता कदम यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


