मुंबई प्रतिनिधी
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू झालेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. शरद पवार गटातील वरिष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विलीनीकरणाबाबत अनेक बैठका झाल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत असताना, अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मात्र बारामतीतील बैठक ही केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्यापुरतीच मर्यादित होती, असे स्पष्ट करत विलीनीकरणाच्या चर्चेला दुजोरा देण्यास नकार दिला. त्यामुळे दोन्ही गटांतील भूमिकांमधील विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे.
फडणवीसांचा शरद पवारांच्या दाव्यावर आक्षेप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी थेट भाष्य केले. शरद पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या दाव्यांवर आक्षेप घेत फडणवीस म्हणाले की, “अजित पवार आणि आमच्यात सातत्याने चर्चा होत असत. जर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत ठोस चर्चा सुरू असती, तर त्याची माहिती अजितदादांनी आम्हाला दिली असती.”
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष असून, त्या पक्षाचे निर्णय ते स्वतः घेतात, असे सांगत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाच्या दाव्यांना छेद दिला.
भाजपची ‘अट’ स्पष्ट
दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण प्रत्यक्षात येणार असेल, तर भाजपची भूमिका काय असेल, या प्रश्नावर फडणवीसांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली. “भविष्यात अशा प्रकारची कोणतीही चर्चा होणार असेल, तर त्याआधी आमच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे,” असे सांगत त्यांनी विलीनीकरणासाठी अप्रत्यक्ष अटच घातली. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांमध्ये परस्पर विश्वास आणि संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढील राजकीय गणिते
सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसह सत्तेत सहभागी आहे, तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी गट विरोधी बाकांवर आहे. अशा परिस्थितीत विलीनीकरण करायचे झाल्यास शरद पवार गटाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार गटाला सत्तेबाहेर पडावे लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते.
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर विराम लागतो की त्या अधिक गती घेतात, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.


