पुणे प्रतिनिधी
‘कामाचा माणूस’ अशी ओळख असणारे, कर्तव्यनिष्ठ राजकारणाचा चेहरा बनलेले आणि सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद भूषवणारे अजित पवार यांचं बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत विमानातील सर्वांचाच मृत्यू झाला.
या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सार्वजनिक जीवनात कठोर, थेट आणि निर्णयक्षम म्हणून ओळखले जाणारे अजित पवार अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याचं वास्तव स्वीकारणं राज्यासाठी जितकं अवघड होतं, तितकंच, किंबहुना त्याहून अधिक, कठीण होतं ते पवार कुटुंबासाठी. आणि त्या सगळ्यातील सर्वात नाजूक, वेदनादायी क्षण होता तो म्हणजे अजित पवारांच्या मातोश्रींना ही बातमी कशी सांगायची, हा प्रश्न.
“सारं जग विरोधात गेलं तरी आई माझ्या बाजूनं असेल,” असं अभिमानानं सांगणारे अजित पवार आईवर जीवापाड प्रेम करणारे होते. कितीही व्यस्त कार्यक्रम असले, तरी शक्य होईल तेव्हा ते आवर्जून आईच्या भेटीसाठी वेळ काढत. त्यांच्या निधनानंतर फार्महाऊसवरून समोर आलेल्या एका घटनेनं सगळ्यांच्या काळजाला चटका लावला.
अपघाताच्या वेळी अजित पवारांच्या मातोश्री शेतावरील घरातच होत्या. नेहमीप्रमाणे त्या सकाळच्या बातम्या पाहत होत्या. सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघाताच्या प्राथमिक बातम्या झळकू लागल्या आणि ‘दादांचा अपघात झालाय का?’ असा सवाल त्यांच्या तोंडून निघाला. आपल्या लेकराला खरंच इजा झाली असेल, एवढीच शंका त्या आईच्या मनात होती.
दरम्यान, बारामतीत अजित पवारांना रुग्णालयात आणल्याच्या बातम्या, त्यानंतर येणारे धक्कादायक अपडेट्स टीव्हीवर वेगाने झळकू लागले. ही भयावह वार्ता आईपर्यंत पोहोचू नये, म्हणून फार्महाऊसवरील टीव्हीची केबल तातडीने तोडण्यात आली. “टीव्ही बिघडला आहे,” असं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. मोबाईल फोनही फ्लाईट मोडवर टाकण्यात आला.
मात्र, आईचं काळीज ते आईचंच.
मनात सतत कालवाकालव सुरू होती. ‘दादांना भेटून येऊ…’ असं म्हणत त्या घराबाहेर पडल्या. चालकानं गाडी बंद पडल्याचा बहाणा केला, तरीही त्या थांबायला तयार नव्हत्या. अखेर नाईलाजानं त्यांना बारामतीतील बंगल्यावर आणण्यात आलं. आणि तिथंच – शब्द अपुरे पडावेत असा – तो क्षण आला. आपल्या लेकराच्या निधनाची बातमी त्या मातेला सांगण्यात आली.
तो क्षण केवळ पाहणाऱ्यांसाठीच नव्हे, तर सांगणाऱ्यांसाठीही असह्य होता. आभाळ कोसळावं तसा आघात त्या आईवर झाला. आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यांसमोर पाहण्याचं दु:ख – याहून मोठं दु:ख कुठलं असू शकतं?
आईसोबतची अखेरची भेट…
या दुर्घटनेच्या अवघ्या चार दिवस आधी, शनिवार 24 जानेवारी 2026 रोजी अजित पवार फार्महाऊसवर आईच्या भेटीसाठी आले होते. सकाळी पाऊण तास त्यांनी आईसोबत गप्पा मारल्या. शेतातील कामगारांशी संवाद साधला, शेतीविषयक सूचना दिल्या, प्रत्येकाची विचारपूस केली आणि पुढील कार्यक्रमांसाठी निघून गेले.
ते गेले खरे – पण परत कधीच न येण्यासाठी.
फार्महाऊसवरील कर्मचारी, कामगार, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. “आमचा मालक गेला…” हे शब्द उच्चारतानाही गळा दाटून येत होता. अजित पवारांच्या जाण्यानं ही केवळ एका नेत्याची हानी नव्हती; तर अनेकांसाठी आपुलकीनं विचारपूस करणारा, कामात सहभागी होणारा माणूस हरपला होता.
राज्याच्या राजकारणावर खोल परिणाम करणारी ही घटना, आणि त्यामागील आई-मुलाचं न तुटणारं नातं – या दु:खानं महाराष्ट्र आजही सुन्न आहे.


