पुणे प्रतिनिधी
बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सह-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचेही निधन झाले. अवघ्या २५व्या वर्षी वैमानिकी क्षेत्रातील उज्ज्वल वाटचाल थांबवणारा हा अपघात संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला.
दिल्लीस्थित चार्टर कंपनी व्हीएसआरकडून संचलित लिअरजेट ४५ या विमानात अजित पवार, त्यांचे पीएसओ, पायलट-कॉकपिट क्रू आणि इतर सदस्य प्रवास करत होते. बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ वाजता बारामती येथे उतरण्याच्या वेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला. धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमानाला आग लागली आणि दुर्घटना घडली.
ग्वाल्हेर ते आकाशाची वाटचाल
कॅप्टन शांभवी पाठक यांचे शिक्षण ग्वाल्हेर येथील एअर फोर्स बाल भारती स्कूलमध्ये झाले. याच काळात उड्डाणाचे स्वप्न आकाराला आले. २०१८ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी. पूर्ण केली. पुढील टप्प्यात न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीमध्ये कठोर व्यावसायिक प्रशिक्षण घेत त्यांनी कमर्शियल पायलट लायसन्स (CPL) मिळवला. हे लायसन्स न्यूझीलंड सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (NZ CAA) तसेच भारताच्या डीजीसीएच्या मानकांनुसार होते.
२०२२ मध्ये त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता अधिक बळकट केली. वैमानिक होण्याबरोबरच भावी पिढी घडवण्याचीही त्यांची इच्छा होती. मध्य प्रदेश फ्लाइंग क्लबमध्ये सहाय्यक उड्डाण प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्याकडे फ्लाइट इन्स्ट्रक्टर रेटिंग (A) होते.
कुटुंबीयांवर शोककळा
शांभवी यांचा धाकटा भाऊ वरुण असून आई रोली शुक्ला पाठक दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. आजी-आजोबा उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहतात. शांभवी यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह वैमानिकी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची कारणे जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवली जात आहे. देशाच्या सार्वजनिक जीवनावर आणि तरुण वैमानिकांच्या स्वप्नांवर काळी छाया पाडणारी ही दुर्घटना म्हणूनच आठवणीत राहणार आहे.


