पुणे प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईहून बारामतीकडे जात असताना आज सकाळी विमानतळावर लँडिंगदरम्यान अपघात झाला. या घटनेमुळे राज्यासह देशभरात शोककळा पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आज व उद्या असे दोन दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सर्व प्रमुख बाजारपेठा, व्यापारपेठा व मार्केट यार्ड बंद राहणार आहेत. बारामती शहरातही आज बंद पाळण्यात येत असून व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने आस्थापना बंद ठेवल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बारामती विमानतळावर लँडिंग करताना वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्याने अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर बचाव व मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले. नागरिक मोठ्या संख्येने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेत आहेत.
अजित पवार हे आज बारामती तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेणार होते. त्यासाठी ते मुंबईहून विमानाने रवाना झाले होते. मात्र लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
या घटनेनंतर राज्यभरातून शोकसंदेश व्यक्त होत असून राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


