मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याची चर्चा सुरू होती. रुग्णालयातील उपचार, शस्त्रक्रिया आणि चेहऱ्यावर मास्क असलेले त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र अखेर स्वतः संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आजाराबाबत स्पष्ट खुलासा केला आहे.
राऊत यांनी आपल्याला कर्करोगाचं (कॅन्सर) निदान झाल्याचं मान्य केलं असून, सध्या उपचार सुरू असल्याचं सांगितलं आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास हा आजार निदान झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती याआधीच समोर आली होती.
मुलाखतीदरम्यान राजकारणावर परखड भूमिका मांडल्यानंतर, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी थेट भाष्य केलं.
“नाही, मला कॅन्सर झाला ना? त्यात काय? दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कॅन्सरचं निदान झालं. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माझं रक्त तपासलं. त्यातून निष्पन्न झालं की मला पोटात कॅन्सर आहे. त्यातून आता मी बाहेर यायचा प्रयत्न करतोय. जेव्हा शक्य झालं, तेव्हा मी बाहेर आलो, उभा राहिलो. अजून काही उपचार सुरू आहेत. काही सर्जरी व्हायच्या आहेत. पण त्या होतील,” असं राऊत म्हणाले.
गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही संजय राऊत यांनी राजकीय आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याचं या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे. आजाराला न घाबरता, आत्मविश्वासाने लढा देण्याची त्यांची भूमिका त्यांच्या समर्थकांमध्ये नवी ऊर्जा देणारी ठरत आहे.


