सातारा प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांची अंतिम यादी ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मंगळवारी साताऱ्यातील हॉटेल फर्न येथे दिवसभर खलबते सुरू होती. या बैठकीत सातारा तालुका वगळता जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणच्या उमेदवारांवर एकमत झाले असून, त्यांना बुधवारी पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. मात्र, सातारा तालुक्यातील काही गटांवर एकमत न झाल्याने निर्णय रखडला असून, त्यामुळे चर्चेची घोडे उशिरापर्यंत अडून राहिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे निवडणूक लढवत असल्याने त्यांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म वितरित केल्याची माहिती आहे. भाजपकडून गट व गणनिहाय उमेदवार निश्चितीसाठी मंगळवारी ‘जंबो’ बैठका पार पडल्या.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, महायुती समन्वयक सुनील काटकर, निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. माणचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विशेष हेलिकॉप्टरने बैठकीसाठी साताऱ्यात दाखल झाले.
हॉटेल फर्नच्या तळमजल्यावर सायंकाळपर्यंत गट व गणांतील उमेदवार निश्चितीवर चर्चा सुरू होती. दरम्यान, कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी अचानक बैठकीत सहभाग घेत काही गटांबाबत भूमिका मांडली. सायंकाळी एका लग्न समारंभासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले निघून गेले. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसलेही कोणतीही प्रतिक्रिया न देता बैठकीच्या ठिकाणाहून बाहेर पडले. मात्र, मंत्री जयकुमार गोरे, सुनील काटकर व अन्य नेत्यांची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शेंद्रे गटावरून चढाओढ
सातारा तालुक्यातील पाटखळ, शेंद्रे आणि कोडोली या गटांसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटाने जोरदार आग्रह धरला होता. मात्र, शेंद्रे गट सोडण्यास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने नकार दिला. वर्णे गट आमदार मनोज घोरपडे यांना, तर खेड गट आमदार महेश शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित लिंब, कारी आणि नागठाणे गट शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाकडे राहिले आहेत.
शेंद्रे गटाच्या वाटपावरून दोन्ही ‘राजें’च्या गटांत रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. अपेक्षित गट न मिळाल्याने उदयनराजे भोसले यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, तर शेंद्रे गट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची भूमिका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने घेतल्याची चर्चा आहे. गणांच्या वाटपावरही उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.
दरम्यान, “आमचे सर्व उमेदवार कमळ चिन्हावरच लढणार आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्नच येत नाही. सर्व उमेदवार भाजपचेच आहेत. आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला असून, त्या त्या तालुक्यात ठरल्याप्रमाणे अर्ज दाखल केले जातील,” अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडली.


