मुंबई प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात सुमारे ९,००० शिक्षकांची भरती करण्यात येणार असून, २०२४-२५ या कालावधीत तसेच मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या रिक्त जागांचाही या भरतीत समावेश करण्यात येणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलद्वारेच राबविली जाणार असून, मार्च २०२६ पासून प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. काही ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात आमदारांनी शिक्षक भरतीचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. त्यानंतर शासनाने पहिल्यांदाच मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदेही आधीच भरण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी जिल्हा परिषदांसह महापालिका व नगरपालिकांच्या शाळांमधील सुमारे ५,७०० शिक्षक पदे रिक्त होत असतात. या सतत वाढणाऱ्या रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
दरम्यान, १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी संचमान्यता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संचमान्यतेच्या निकषांनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे प्रथम समायोजन केले जाईल. त्यानंतर उर्वरित रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरली जाणार आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांना मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे धरून पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड कराव्या लागणार आहेत. त्यानुसार केंद्रीकृत पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
राज्यातील शिक्षक पदांची स्थिती
एकूण मंजूर पदे : १.९० लाख
सध्या रिक्त पदे : ६,०००
अतिरिक्त शिक्षक : २,४००
मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणारे शिक्षक : ५,५००
शिक्षक भरतीची जबाबदारी परीक्षा परिषदेकडे
शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक भरतीची प्रक्रिया आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे, असा शासन निर्णय झाला आहे. मात्र, परीक्षा परिषदेतील कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने ‘टीईटी’ परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रथमच त्यांच्या माध्यमातून होणार असल्याने कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक ठरणार आहे. तसेच परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबतचे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘टीईटी’चा निकाल याच महिन्यात
दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)चा निकाल अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू असून, ३१ जानेवारीपूर्वी टीईटीचा निकाल जाहीर होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार आगामी शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.
राज्यातील शिक्षक भरतीचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे ग्रामीण व शहरी भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


