पुणे प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, प्रचाराचा जोर वाढला आहे. मात्र या निवडणुकीत विविध ठिकाणी वेगवेगळ्या युती-आघाड्यांची समीकरणे पाहायला मिळत आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये थेट एकमेकांविरोधात रिंगणात उतरले आहेत.
नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारीला संपल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचाराला गती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधून प्रचाराची सुरुवात करताना भाजपावर निशाणा साधला. “ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्यांच्यासोबत आज मी सत्तेत सहभागी आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विधानानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “७० हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निर्णय काय येईल, हे पाहावे लागेल. ही केस विचाराधीन असताना अशा बाबी निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर काढू नयेत.”
बावनकुळे यांनी अजित पवारांचा उल्लेख “प्रगल्भ नेते” असा करत, एका महापालिका निवडणुकीसाठी महायुतीत मनभेद निर्माण होईल, असे वक्तव्य टाळावे, असे मत व्यक्त केले. “बोलायचे ठरवले तर आमच्याकडेही बरेच काही सांगण्यासारखे आहे; मात्र ही योग्य वेळ नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“मी अजित पवारांना सल्ला देण्याइतका मोठा नाही,” असे सांगत बावनकुळे म्हणाले, “मात्र महायुतीतील समन्वय बैठकीत ठरल्याप्रमाणे वागणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ते अनेक वर्षे सत्तेत होते. आम्ही मागची पाने उलटली तर त्यांना काही बोलता येणार नाही; पण तसे करण्याची आमची इच्छा नाही.”
महायुतीत मतभेद निर्माण होणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असा अप्रत्यक्ष इशाराच बावनकुळे यांनी अजित पवारांना दिला आहे.


