पुणे प्रतिनिधी
पुण्याच्या राजकीय, प्रशासकीय आणि क्रीडा क्षेत्रावर दीर्घकाळ प्रभाव टाकणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 82व्या वर्षी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. उपचार सुरू असतानाच दुपारी त्यांचे निधन झाले. आज दुपारी पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय हवाई दलातील पायलट ते राष्ट्रीय राजकारणातील प्रभावी नेते असा कलमाडी यांचा प्रवास अनेक वळणांनी भरलेला होता. 1 मे 1944 रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी राजकारणात येण्यापूर्वी भारतीय हवाई दलात सहा वर्षांहून अधिक काळ पायलट म्हणून सेवा बजावली. सैन्यातून निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
पुण्याचे प्रतिनिधित्व करत त्यांनी लोकसभेत दीर्घकाळ काम केले. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. विशेष बाब म्हणजे, रेल्वे राज्यमंत्री असतानाच त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प मांडला होता, हा मान मिळवणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरले.
पुण्याच्या विकासात ठसा
पुणे शहराच्या विकास प्रक्रियेत कलमाडी यांचा सक्रिय सहभाग होता. विमानतळाचा विकास, मेट्रो प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि शहराला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पुण्याची सांस्कृतिक आणि क्रीडा ओळख अधिक ठळक झाली.
या राजकीय प्रभाव, प्रशासकीय पकड आणि विकासकामांमुळेच स्थानिक राजकारणात त्यांना पुण्याचे ‘कारभारी’ अशी उपाधी मिळाली होती. शहराच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा शब्द वजनदार मानला जात असे.
क्रीडा प्रशासन आणि वाद
1996 ते 2011 या काळात सुरेश कलमाडी यांनी भारतीय ऑलिंपिक संघटना (IOA) अध्यक्षपद भूषवले. या काळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले. मात्र 2010 मधील दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार, खर्चवाढ आणि कंत्राटांतील अनियमिततेचे गंभीर आरोप झाले.
25 एप्रिल 2011 रोजी सीबीआयने त्यांना भ्रष्टाचार व कट रचल्याप्रकरणी अटक केली होती. यानंतर ईडीकडून मनी लाँडरिंग प्रकरणीही तपास झाला. मात्र पुरावे अपुरे ठरल्याने 2025 मध्ये ईडीने क्लोजर रिपोर्ट दाखल केला, जो न्यायालयाने स्वीकारला. या निकालानंतर कलमाडी यांच्यावरील आरोपांच्या सावलीतून त्यांची प्रतिमा काही अंशी मुक्त झाली.
या प्रकरणानंतर त्यांचे राजकीय अस्तित्व काही काळ मर्यादित झाले होते. तथापि, अलीकडील काळात पुणे महापालिकेला दिलेल्या भेटीमुळे ते पुन्हा चर्चेत आले होते.
मिश्र वारसा
सुरेश कलमाडी यांचा वारसा हा विकासकामे, प्रशासकीय प्रभाव आणि वाद यांचा संमिश्र असा राहिला. पुण्याच्या जडणघडणीत त्यांनी बजावलेली भूमिका आणि त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धांमुळे निर्माण झालेल्या वादांमुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक प्रभावी पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


