मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात दोन दशकांपूर्वी प्रचंड वादाला कारणीभूत ठरलेल्या अमेरिकन इतिहासकार जेम्स लेन यांच्या ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकाबाबत अखेर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने जाहीर माफी मागितली आहे. पुस्तकातील काही वादग्रस्त मजकूर कोणतीही योग्य पडताळणी न करता प्रकाशित करण्यात आल्याची कबुली देत, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले तसेच महाराष्ट्रातील जनतेची दिलगिरी व्यक्त केली आहे.
२००३ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि तथ्यहीन उल्लेख करण्यात आल्याचा आरोप झाला होता. विशेषतः पुस्तकातील पान क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वरील विधानांमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. या मजकुरामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली होती. उदयनराजे भोसले यांनीही या पुस्तकाचा तीव्र निषेध करत प्रकाशकांवर कारवाईची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने चालवली जाणारी प्रकाशन संस्था असून, तिने आता वृत्तपत्रांमध्ये नोटीस प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुस्तकातील संबंधित विधानांची शास्त्रीय आणि ऐतिहासिक पडताळणी न करता ती छापण्यात आल्याचे मान्य करत, “ही आमची गंभीर चूक असून त्याबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते,” असे या जाहीर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या चुकीमुळे उदयनराजे भोसले तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने स्पष्टपणे म्हटले आहे. प्रकाशन क्षेत्रातील जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेकडून अशी माफी मागितली जाणे ही दुर्मिळ घटना मानली जात असून, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबाबत लेखन करताना काटेकोर पडताळणी किती आवश्यक आहे, यावर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
दरम्यान, या माफीनंतर राज्यातील इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, सत्य आणि इतिहासाबाबतची जबाबदारी आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनीही गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


