पुणे प्रतिनिधी
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. घाटमाथ्यावर होणारी वाहतूक कोंडी, प्रवासातील विलंब आणि अपघातांचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित केबल-स्टेड पुलासह दोन बोगदे आणि मोठ्या पुलांचा समावेश असलेला हा प्रकल्प पूर्णत्वाकडे झपाट्याने वाटचाल करत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) पुलाच्या दोन्ही टोकांना जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. द्रुतगती मार्गावर सध्या विशेषतः लोणावळा–खोपोली घाटात वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ‘मिसिंग लिंक’ जोडली जात असून, त्यातून प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा अपव्यय दोन्ही कमी होणार आहेत.
भाजप–महायुती सरकारच्या काळातच सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग उभारण्यात आला होता. मात्र, घाटमार्गातील तीव्र वळणे, चढ-उतार आणि वाढती वाहनसंख्या यामुळे गेल्या काही वर्षांत प्रवास अधिकच वेळखाऊ होत होता. याच पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला गती देण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटदरम्यानचा महामार्ग सहापदरीवरून आठपदरी करण्यात येत आहे. तसेच खोपोली ते कुसगाव या सुमारे १३.३ किलोमीटरच्या टप्प्यावर दोन बोगदे आणि दोन मोठे पूल उभारले जात आहेत.
या सुधारणा पूर्ण झाल्यानंतर द्रुतगती मार्गाचे एकूण अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होणार आहे. परिणामी, पुणे–मुंबई प्रवासाचा कालावधी किमान अर्धा तासाने घटणार असून, ‘मुंबई पुण्याच्या अधिक जवळ’ येणार असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. विशेषतः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर पुणेकरांसाठी तेथे पोहोचणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे.
उद्योग, व्यापार आणि आयटी क्षेत्रासाठी पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग हा जीवनवाहिनी मानला जातो. शिक्षण, आरोग्य, नोकरी तसेच व्यावसायिक कारणांसाठी या मार्गावरून दररोज सुमारे दीड लाख वाहने ये-जा करतात. घाटात होणाऱ्या कोंडीचा फटका अनेकदा प्रवासी आणि वाहतूक व्यवस्थेला बसतो. ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर हा त्रास लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उद्योगजगतामधील विश्लेषकांच्या मते, प्रवासाचा वेळ कमी झाल्याने पुण्याच्या अर्थकारणाला गती मिळेल. गुंतवणूकदारांसाठी पुणे अधिक आकर्षक ठरेल आणि मुंबई–पुणे औद्योगिक पट्ट्यातील दळणवळण अधिक सक्षम होईल. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांसाठी ही ‘मिसिंग लिंक’ खऱ्या अर्थाने विकासाची जोड ठरणार आहे.


