मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) उपक्रमातील सेवानिवृत्त कामगार आणि अधिकाऱ्यांना अद्याप त्यांच्या हक्काची उपदान (ग्रॅच्युटी) व अंतिम देयके न मिळाल्याने तीव्र असंतोष व्यक्त होत असून, या पार्श्वभूमीवर येत्या ७ जानेवारी रोजी आझाद मैदानात चड्डी–बनियान आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
बेस्ट उपक्रमातील सुमारे ६,५०० सेवानिवृत्त कामगार व अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२२ पासून उपदान आणि अंतिम देयके देण्यात आलेली नाहीत. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ देणी रखडल्याने अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या काळात देणी न मिळाल्यामुळे १०० ते १५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याचा गंभीर दावा संघटनांनी केला आहे.
देणी मिळावीत यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेक वेळा निवेदने दिली, आंदोलने केली. काहींनी तर आपली व्यथा मांडण्यासाठी मुंबईत भीक मागो आंदोलन देखील केले. बेस्टचे महाव्यवस्थापक, मुंबई महापालिकेचे आयुक्त, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांच्याकडे वारंवार निवेदने सादर करूनही ठोस निर्णय झालेला नाही, अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
३० ते ३५ वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आजही आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे चित्र आहे. करोना महामारी, दंगली, अतिवृष्टीसारख्या आपत्तीजनक काळातही बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा केली. मात्र सेवानिवृत्तीनंतर मूलभूत देणी मिळवण्यासाठी त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
“आम्ही आयुष्यभर जनतेसाठी काम केले. आज मात्र आमच्या हक्काच्या पैशांसाठी कपडे उतरवून आंदोलन करण्याची वेळ आली आहे,” अशी भावना एका सेवानिवृत्त बेस्ट अधिकाऱ्याने व्यक्त केली. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून देणी अदा करावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


