मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहराच्या राजकारणात चुरस वाढली असून, मुंबईचा पुढील महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या एका नव्या सर्व्हेमुळे सत्तासमीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मराठी मतदारांइतकेच अमराठी आणि मुस्लिम मतदारही निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज ठाकरे यांनी “मुंबईचा महापौर मराठीच होणार” असे ठाम वक्तव्य केले असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही “महापौर महायुतीचाच, हिंदू आणि मराठीच असेल” असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक गणित पाहता केवळ मराठी मतांवर नव्हे, तर अमराठी आणि मुस्लिम मतदारांच्या कलावरही निकाल अवलंबून राहणार असल्याचे या सर्व्हेतून स्पष्ट होते.
काय सांगतो सर्व्हे?
AsceIndia या संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सविस्तर सर्व्हेनुसार, यंदाही मुंबईत मतदानाची टक्केवारी २०१७ प्रमाणेच सुमारे ५५ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. या सर्व्हेमध्ये समाजघटकनिहाय मतांचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यातून सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मराठी मतदारांचा कौल कुणाकडे?
सर्व्हेनुसार, मुंबईतील जवळपास निम्मे मराठी मतदार ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, यांच्याबरोबर असल्याचे चित्र आहे. तरीही एकूण गणित पाहता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती सत्तेच्या जवळ असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आकडेवारीनुसार, भाजप-शिवसेना महायुतीला ४२ टक्के मराठी मते मिळू शकतात, तर ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे युतीला ४४ टक्के मराठी मतांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ ४ टक्के, तर इतर पक्षांना सुमारे ११ टक्के मराठी मते मिळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधू आणि महायुती यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळणार आहे.
अमराठी मतदारांचा निर्णायक कौल
या निवडणुकीत अमराठी मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे सर्व्हे अधोरेखित करतो. तब्बल ५३ टक्के अमराठी मतदार भाजप आणि शिवसेना महायुतीच्या बाजूने असल्याचा अंदाज आहे. त्याउलट ठाकरे गट आणि मनसे यांना केवळ १५ टक्के अमराठी मते मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसला १९ टक्के, तर इतर पक्षांना १३ टक्के अमराठी मते मिळू शकतात. भाजप-शिवसेनेला मिळणारा हा मोठा अमराठी पाठिंबा महापौरपदाचा कौल फिरवणारा ठरू शकतो.
मुस्लिम मतदारांचा कल
मुस्लिम मतदारांच्या बाबतीत चित्र वेगळे आहे. सर्व्हेनुसार, काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के मुस्लिम मते मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे युतीला २८ टक्के, तर भाजप-शिवसेना महायुतीला केवळ ११ टक्के मुस्लिम मते मिळू शकतात.
राजकीय प्रतिक्रिया
या सर्व्हेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या शायना एन. सी. यांनी, “विरोधक फक्त घोषणाबाजी करतात; आम्ही प्रत्यक्ष काम करतो. मुंबईकर कामालाच मत देतात,” असा दावा केला आहे.
एकूणच, मराठी मते ठाकरे बंधूंकडे झुकलेली असली, तरी अमराठी मतदारांचा भाजप-शिवसेनेकडे असलेला कौल आणि मुस्लिम मतदारांचा काँग्रेसकडे असलेला कल, या त्रिसूत्री समीकरणामुळे मुंबईचा महापौर कोण होणार, याचा फैसला शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितच राहणार आहे. अंतिम निकाल १६ तारखेलाच स्पष्ट होणार असून, तोपर्यंत मुंबईच्या राजकारणात धाकधूक कायम राहणार आहे.


