मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी अंतर्गत शिस्तभंग कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि उमेदवारी प्रक्रियेत गैरप्रवृत्ती केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एकूण २९ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या कारवाईत शिवसेना नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शेखर वायंगणकर यांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षातील शिस्त अधिक कडक करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच काही पदाधिकाऱ्यांकडून पक्षरेषेला छेद देणाऱ्या हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी पक्षनेतृत्वाकडे पोहोचल्या होत्या. त्यानंतर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
मुंबईतील २९ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
शिवसेना (उबाठा) कडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुंबईतील विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. विभागनिहाय कारवाई पुढीलप्रमाणे आहे—
विभाग क्र. ३ : प्रभाग क्र. ७४ – संदीप मोरे, मंदार मोरे
विभाग क्र. ४/५ : प्रभाग क्र. ९५ – शेखर वायंगणकर
विभाग क्र. ६ : प्रभाग क्र. १६९ – कमलाकर नाईक, प्रभाग क्र. १७० – सोनाली म्हात्रे
विभाग क्र. ७ : प्रभाग क्र. १०९ – संगीता गोसावी
विभाग क्र. ८ : प्रभाग क्र. १३१ – नीता शितोळे, प्रभाग क्र. १४२ – रोहिदास ढेरंगे
विभाग क्र. ९ : प्रभाग क्र. १४३ – सदाशिव बालगुडे, विराग पावसकर; प्रभाग क्र. १५० – विकी मोरे; प्रभाग क्र. १५५ – निखिल भोईटे; प्रभाग क्र. १४६ – आनंद इंगळे; प्रभाग क्र. १४७ – विजय नागावकर
विभाग क्र. १० : प्रभाग क्र. १८३ – रोहित खैरे, गणेश खाडे; प्रभाग क्र. १८६ – गणेश सोनवणे, चेतन सूर्यवंशी, माधुरी गायकवाड; प्रभाग क्र. १८५ – कमलेश वारीया
विभाग क्र. ११ : प्रभाग क्र. १९३ – बाबू कोळी; प्रभाग क्र. १९७ – परशुराम (छोटू) देसाई; प्रभाग क्र. २०२ – विजय इंदुलकर; प्रभाग क्र. २०७ – रोहित देशमुख; प्रभाग क्र. २०८ – मंगेश बनसोड; प्रभाग क्र. २०३ – दिव्या बडवे
विभाग क्र. १२ : प्रभाग क्र. २१८ – नयना देहेरकर, आरती लोणकर; प्रभाग क्र. २२५ – प्रवीण कोलाबकर
या सर्वांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वसई–विरार महापालिकेतही कारवाई
मुंबईपाठोपाठ वसई–विरार शहर महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. हरिश्चंद्र गोविंद पाटील, दिलीप गोपाळ कुवेसकर, विश्वास भास्कर किणी, वैभव विद्याधर चेंडेकर, श्रीकांत गोपाळ महाकाळ, शैलेंद्र श्रीकांत गोळवणकर, अॅड. कल्याणी किरण पाटील आणि हेमलता भगत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पत्रकाद्वारे दिली आहे.
ठाकरे बंधू आज संयुक्त वचननामा जाहीर करणार
दरम्यान, मुंबईच्या राजकारणात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना–मनसेचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा संयुक्त वचननामा जाहीर करणार आहेत. दुपारी १ वाजता शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
२० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात
मनसेची स्थापना झाल्यानंतर जवळपास २० वर्षांनंतर प्रथमच राज ठाकरे शिवसेना भवनात येणार आहेत. ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्यामुळे मुंबई पालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने, आगामी महापालिका निवडणूक अधिकच चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.


