मुंबई प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत उत्साहाचे वातावरण असताना, शहराच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दिवसरात्र रस्त्यावर तैनात असतात. मात्र, कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर काळाने झडप घातली. ३१ डिसेंबर रोजी ड्युटी आटोपून घरी जात असताना लोकल ट्रेनमधून तोल जाऊन पडल्याने वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल देविदास सस्ते (वय …) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर २०२५) सायंकाळी मुलुंड रेल्वे स्थानकावर घडली. सहारा वाहतूक विभागात कार्यरत असलेले देविदास सस्ते हे कर्तव्य बजावून लोकल ट्रेनने घरी जात होते. दरम्यान, मुलुंड स्थानकात ट्रेन थांबत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते प्लॅटफॉर्मवर कोसळले. त्यांच्यासोबत असलेले वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी ब्राह्मणे यांनी तातडीने त्यांना जवळच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास सस्ते हे गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या हृदयात चार ब्लॉकेज आढळून आले होते. त्यानंतर ७ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर या कालावधीत ते वैद्यकीय रजेवर होते. कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कर्तव्य बजावत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सस्ते कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तीव्र शोक व्यक्त केला आहे.


