ठाणे प्रतिनिधी
राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. फॅमिली कोर्टाच्या आवारातच एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध देऊन कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. ‘बर्थडे सेलिब्रेशन’च्या बहाण्याने हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप आहे.
पीडितेकडून तक्रार दाखल होताच ठाणे नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली असून रवी पवार हा फरार आहे. पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके काम करत आहेत. न्यायालयाच्या आवारात ही घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तीन महिन्यांनी प्रकाराचा उलगडा
25 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या या भीषण प्रकरणाचा उलगडा तब्बल तीन महिन्यांनी झाला. ब्लॅकमेलिंग आणि बदनामीच्या भीतीने शांत राहिलेल्या पीडितेने अखेर धैर्य एकवटून 5 डिसेंबर रोजी तक्रार नोंदवली.
पीडित विवाहितेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील जाहिरात पाहून संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला होता. चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आश्वासनावर आरोपींनी तिचा विश्वास जिंकत ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये काम मिळवून दिले. 25 ऑगस्टच्या रात्री साडेआठच्या सुमारास एका आरोपीने स्पामध्ये जाऊन तिच्याकडून मसाज घेतला आणि ‘आज माझा वाढदिवस आहे’ असे सांगत बाहेर असलेल्या इर्टिगा कारमध्ये तिला बोलावले.
गुंगीचे औषध मिसळलेला केक, अंधारात अत्याचार
कार थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या पार्किंगमध्ये नेण्यात आली. अंधाऱ्या परिसरात केक कापताना आरोपींनी त्यात गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यावर तिची शुद्ध हरपली आणि याच संधीचा गैरफायदा घेत दोन्ही आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले.
रात्री 11 वाजता तिला रस्त्यावर फेकून देताना “कोणाला सांगितले तर व्हिडिओ व्हायरल करू,” अशी धमकीही देण्यात आली. पुढील तीन महिने आरोपींनी या व्हिडिओच्या आधारे तिला सातत्याने ब्लॅकमेल केल्याचा दावा तिने केला आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. न्यायालय परिसरातील सुरक्षा व देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ही घटना असल्याने कायदा-सुव्यवस्था व्यवस्थेकडे पुन्हा एकदा बोटे उठत आहेत.


