कोल्हापूर प्रतिनिधी
अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीबाबत राज्य सरकारने केलेल्या आश्वासनांमध्ये व प्रत्यक्ष दिलेल्या मानधनात झालेल्या तफावतीविरोधात संताप व्यक्त करत आज हजारो सेविका रस्त्यावर उतरल्या. सरकारने जाहीर केलेल्या १५ हजारांच्या ऐवजी १३ हजार, तर मदतनीसांसाठी अपेक्षित ८५०० ऐवजी ७५०० रुपये मानधन देत असल्याने हे “उघड फसवेपण” असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना (आयटक संलग्न) यांच्या नेतृत्वाखाली महावीर उद्यानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सेविका सहभागी झाल्या. घोषणांनी परिसर दणाणून सोडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सरकारच्या धोरणांवर टीका करत सतीशचंद्र कांबळे म्हणाले, “अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठीचा संघर्ष अनेक वर्षे सुरू आहे. न्यायालयीन आदेश, किमान वेतन कायदा आणि मानवी हक्कांचे उल्लंघन शासन करत आहे. महिला रस्त्यावर उतरत असतील तर तो असंतोषाचा संकेत आहे, हे सरकारने लक्षात ठेवावे.” त्यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारकडून मिळणारा प्रतिसाद “वाटाण्याच्या अक्षता” पद्धतीचा असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवला जाईल.
संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील म्हणाल्या, “जाहीर केलेले मानधन आणि प्रत्यक्ष देण्यात येणारी रक्कम यातील तफावत आम्ही सहन करणार नाही. आमची फसवणूक थांबली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
निवेदन स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव उपस्थित होते. या आंदोलनात अकिब पठाण, वर्षा लव्हटे, रेखा पाटील, अर्चना कांबळे, अक्काताई पाटील, हेमा जाधव, जयश्री बंगले, मीना पवार, ममता साठे, वर्षा पोरे, ज्योती पाटील आदींचा सहभाग होता.
सेविका,मदतनीसांचा रोष, शासनाच्या आश्वासनांबाबतचा अविश्वास आणि आगामी तीव्र आंदोलनाची गर्जना यामुळे मानधनवाढीच्या मुद्याला आता नवीन उग्र वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.


