कोल्हापूर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील शिस्तभंग आणि ढिसाळ कारभारावर थेट बोट ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बुधवारी सकाळी अनपेक्षित ‘स्टिंग’ केले. स्वतःला रुग्ण म्हणून दाखवत हसूर (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते पोहोचले आणि तेथे दिसलेल्या अव्यवस्थेवर त्यांनी अधिकाऱ्यांना झाप दिली.
सकाळी कामकाजाची वेळ ८.३० अशी असतानाही केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि बहुतेक कर्मचारी अनुपस्थित होते. काही ग्रामीण रुग्ण तासभरापासून थंडीत थांबलेले असतानाच कार्तिकेयन एस. व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनाही प्रतीक्षा करावी लागली. डॉक्टर कधी येतात? असा साधा प्रश्न विचारताच रुग्णांकडून “वेळेत येत नाहीत”, “कर्मचारी हवे तसेच येतात”, “दररोज ताटकळत बसावे लागते” अशा तक्रारी अक्षरशः ओघाने समोर आल्या.
टी-शर्ट, मास्क आणि साध्या पोशाखात गेलेल्या सीईओंच्या येण्याच्या उद्देशाची कल्पनाही कर्मचाऱ्यांना नव्हती. काही जण उशिरा येताना दिसताच त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले. केंद्रातील औषधसाठा, स्वच्छता, रजिस्टर, नोंदी तसेच बायोमेट्रिक उपस्थिती यांची त्यांनी सविस्तर पाहणी केली.
“अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ८.३० पर्यंत उपस्थित असणे बंधनकारक आहे. मुख्यालयात राहूनच सेवा द्यावी. लोकांच्या तक्रारी निवारणासाठी आपण जबाबदार आहोत,” अशी कडक भूमिका कार्तिकेयन एस. यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन कामकाजाची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या हालांचा प्रत्यक्ष अनुभव घेत सीईओंनी कारवाईला गती दिल्याने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.


