स्वप्नील गाडे|रिपोर्टर
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढत्या मोबाईल चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या ‘मोबाईल शोध’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तब्बल १,०१८ हरवलेले मोबाईल शोधून काढत त्यांचा १ कोटी ८० लाख ३३ हजार ६६८ रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. रेल्वे पोलिसांची ही कारवाई त्यांच्या दक्षतेचे आणि तंत्रज्ञानाधारित तपास क्षमतेचे ठळक उदाहरण ठरली आहे.

पोलिस आयुक्त एम. कलासागर यांनी १८ मे २०२५ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर रेल्वे आयुक्तालयातील गुन्हेगारी स्थितीचा सखोल आढावा घेतला. या अहवालात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विशेष शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले.
पहिला टप्पा : जून–जुलै २०२५
पहिल्या टप्प्यात एकूण ६८४ मोबाईल परत मिळवण्यात आले. या हॅण्डसेटची एकूण किंमत १ कोटी ११ लाख ३९ हजार ६२६ रुपये असून, २५ जुलै रोजी घाटकोपर येथील कार्यक्रमात ते संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आले.
दुसरा टप्पा : सप्टेंबर–नोव्हेंबर २०२५
पहिल्या यशानंतर ही मोहीम आणखी व्यापक स्वरूपात घेण्यात आली. मध्य परिमंडळातील २८ व पश्चिम परिमंडळातील २९ अशा ५७ पथकांनी देशभरातील १७ राज्यांमध्ये जाऊन मोठी मोहीम उभी केली. मुंबईतून ४४४, महाराष्ट्रातील इतर भागांतून २१६ आणि देशातील इतर राज्यांतून ३५८ मोबाईल हस्तगत करण्यात आले.
१० डिसेंबरला भव्य कार्यक्रम
या दोन टप्प्यांतील कामगिरीतून एकूण १,०१८ मोबाईल परत मिळाले. १० डिसेंबर रोजी घाटकोपर येथील नवरंग सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा मुद्देमाल संबंधित प्रवाशांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. या उपक्रमात पोलिस उपआयुक्त प्रज्ञा जेडगे, सुनिता सांळुखे-ठाकरे, तसेच सायबर सेलचे पोलिस निरीक्षक मंगेश खाडे यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुंबई रेल्वे पोलिसांच्या या मोहिमेमुळे प्रवाशांचा विश्वास अधिक बळकट झाला असून, अशा प्रकारच्या मोहिमा देशातील इतर पोलीस दलांसाठीही मार्गदर्शक ठरतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


