मुंबई प्रतिनिधी
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली सुरू असलेला मनमानी कारभार, अपात्रतेचा वाढता पेच आणि अदानी समूहाला मिळणारे प्राधान्य, या सर्वांच्या निषेधार्थ रविवारची संध्याकाळ धारावीत संतापाच्या लाटेने पेटून उठली. कामराज हायस्कूलसमोर भरलेल्या सर्वपक्षीय इशारा सभेत धारावीकरांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला: “धारावीकरांना धारावीतच घरे हवीत; विस्थापन कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. कितीही ताकद लावा… अदानीला धारावीतून पळवूच!”
मेघवाडी–गणेशनगर परिसरातील झोपड्या तोडण्याचे एसआरएचे नोटीसधारक इशारे हे आंदोलनाचे मुख्य कारण ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच धारावीत सभा घेऊन “धारावीकरांना धारावीतच घरे” देण्याचे आश्वासन दिले असतानाच, प्रत्यक्षात मेघवाडीतील रहिवाशांना हटवण्याच्या हालचालींनी संताप उसळला.
सभेत शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार अनिल देसाई, माकपचे प्रकाश रेड्डी, आपच्या प्रीती मेनन यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि धारावीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
“धारावी सोन्याची जमीन; सरकारच्या नजरा तिकडे” — अनिल देसाई
सभेत बोलताना खासदार अनिल देसाई म्हणाले,
“धारावीची जमीन ही सोन्यासारखी आहे. सरकारची नजर या जमिनीवर असून अदानीला पुढे करून धारावीकरांना फसवण्याचा डाव सुरू आहे. ५–१० हजार लोकांना घरे देणार आणि उरलेल्यांना धारावीबाहेर ढकलीणार हा सरकारचा उद्देश दिसतो. पण कितीही ताकद लावा, उबाठा आणि मित्रपक्ष मिळून अदानीला धारावीत टिकू देणार नाही.”

ते पुढे म्हणाले,
“हा लढा धारावीकरांच्या अस्तित्वाचा आहे. एकजूट ठेवा; संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील.”
“उलट अदानीलाच धारावीतून पळवू” — प्रकाश रेड्डी
माकपचे नेते कॉ. प्रकाश रेड्डी यांनी आक्रमक भूमिका घेत म्हणाले,
“आज मेघवाडी हटवण्याची नोटीस आली आहे; उद्या कुंभारवाडा, कोळीवाडा, आझादनगर, टिळकनगर इथेसुद्धा हीच स्थिती होऊ शकते. त्यामुळे धारावीकरांनी सतर्क राहा! आम्ही धारावी सोडणार नाही. उलट अदानीलाच धारावीतून पळवून लावू.”
“५२७ एकर नव्हे, तर ५०० एकर हडप करण्याचा प्रयत्न” बाबुराव माने
धारावी बचाव आंदोलनाचे नेते, शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी आमदार बाबुराव माने म्हणाले,
“मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची जमीन अदानीने धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी घेतली आहे, पण उद्देश वेगळाच आहे, धारावीची सुमारे ५०० एकर जमीन हडप करण्याचा डाव सुरू आहे. धारावीकर जागे झाले नाहीत, तर उद्या सर्व वस्त्यांना हटवण्याची वेळ येईल.”
“मेघवाडी खाली करू नका” आमदार महेश सावंत
आमदार महेश सावंत यांनी स्पष्ट इशारा दिला,
“सरकारने मेघवाडीतील रहिवाशांशी लेखी करार करावा. हक्काची घरे द्यावीत. जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत मेघवाडी खाली करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.”
“धारावी हे मुंबईचं हृदय; याच्याशी पंगा का?” प्रीती मेनन
आपच्या प्रीती मेनन म्हणाल्या,
“धारावी हे मुंबईचे हृदय आहे. अदानीने याच्याशी पंगा का घेतला? सरकारला एक दिवस धारावीकरांसमोर गुडघे टेकावे लागतील.”

धारावीकरांच्या प्रमुख मागण्या
1. प्रत्येक पात्र–अपात्र झोपडपट्टीधारकास किमान 500 चौ.फु.चे घर द्यावे.
2. कोणालाही धारावीबाहेर हटवणार नाही याबाबत सरकारने लेखी आश्वासन द्यावे.
3. घर व दुकान बदल्यात ‘घर–दुकान–व्यवसाय’ यांची सुलभ जागा द्यावी.
4. पुनर्विकास ‘जैसे थे’ धोरणानुसार, जेथे झोपडपट्टी तेथेच पुनर्वसन=हे धोरण पाळावे.
5. अपात्र ठरवण्याची प्रक्रिया पारदर्शक करावी आणि धारावीबाहेर पुनर्वसनाच्या निर्णयाचा खुलासा करावा.
सर्वपक्षीय एकजुटीचा धडक संदेश
सभेला कॉ. शैलेंद्र कांबळे, बाबुराव माने, आरिफ सय्यद, उलेश गजाकोश, राजू कोरडे, आपचे एन.आर. पॉल, मनसेचे आरिफ शेख, वसंत खंदारे, अरुणा चलम आदी नेते उपस्थित होते. धारावीच्या सर्व वस्त्यांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ही सभा ऐतिहासिक ठरवली.
धारावीकरांची गगनभेदी गर्जना
सभेच्या अखेरीस धारावीकरांनी एकमुखी निर्धार व्यक्त केला.
“आम्ही धारावी सोडणार नाही. पुनर्विकास हवा, पण विस्थापन नाही. कितीही ताकद लावा… अदानीला धारावीतून पळवूच!”


