उमेश गायगवळे मुंबई
महाराष्ट्र उजेडात आहे, म्हणतात. मेट्रोचे दिवे, एक्स्प्रेस-वेचे फ्लायओव्हर, परदेशी गुंतवणुकीचे ग्लॅमर आणि डिजिटल इंडिया… पण त्या उजेडाच्या मागे एक अंधार आहे, न बदलणाऱ्या जुन्या परंपरांचा, जात-पातीच्या वर्चस्वाचा, आणि प्रेमाच्या नावाने घेतल्या जाणाऱ्या निर्घृण सूडाचा. हा अंधार वेळोवेळी उघडा पडतो… कधी खैरलांजी बनून, कधी पिंपरी, सातारा, बीड बनून… आणि अलीकडेच नांदेडमध्ये सक्षम ताटे या २०,२५ वर्षांच्या तरुणाच्या निर्घृण हत्येच्या रूपाने.

या मुलाने कोणता गुन्हा केला होता?
फक्त एवढाच, आपल्या जातीपेक्षा वेगळ्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं.
आपण २१व्या शतकात आहोत म्हणवतो, पण काहींच्या डोक्यातील जात अजूनही १८व्या शतकातच अडकलेली आहे.
आंतरजातीय विवाहाचा कायदा, कागदावरचा शहाणा, प्रत्यक्षातील दीन
स्वातंत्र्यानंतर लगेचच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले विचार अगदी स्पष्ट होते, “जात नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह ही अनिवार्य पायरी आहे.”
याच दृष्टीने १९५४ चा विशेष विवाह अधिनियम (Special Marriage Act) लागू झाला. संविधानाच्या मूल्यांप्रमाणे, दोन संमती असलेल्या व्यक्तींना विवाह करण्याचा अधिकार देणारा हा कायदा देशाच्या सामाजिक उन्नतीचा पाया ठरणार होता.
पण प्रश्न आहे हा पाया कधी रचला?
कायद्याची अंमलबजावणी मात्र आजही कागदांच्या फाईलमध्येच बंदिस्त आहे.
भारत सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणल्या.
केंद्र – २.५ लाख रुपये पर्यंत अनुदान.
राज्ये – काहींनी ३ ते ५ लाखांपर्यंत आर्थिक मदत, घरगुती साहित्य, संरक्षणाची तरतूद.
पण प्रत्यक्ष स्थिती काय?
बहुतांश जोडपी भीतीने नोंदणी करतच नाहीत.
जी करताहेत, त्यांना संरक्षण मिळत नाही.
अनुदानासाठी फाईली महिनोन्महिने जिल्हाधिकारी कार्यालयात अडकतात.
धमक्या मिळाल्यावर पोलीस पहिल्यांदा “घरी सोडवून घ्या” असा सल्ला देतात.
कायदा आहे… पण त्यातली ताकद?
कागदाचा वास जास्त, न्यायाचा सार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी का दिली आंतरजातीय विवाहाला मान्यता?
आंबेडकरांनी समाजशास्त्रज्ञाप्रमाणे जे विश्लेषण केलं होतं ते आजही शंभर टक्के लागू पडतं.
त्यांच्या मते-
जात ही समाजातील सर्वात खोलवर रुजलेली दरी, जी नातेसंबंधांपासून सत्तेपर्यंत सर्वत्र असर करते.
ही दरी कमी करायची असेल, तर विवाहाची चौकट मोडणे आवश्यक.
दोन भिन्न जाती एकत्र आल्या तरच “मानवी नात्यांचे मिश्रण आणि सामाजिक समानता” शक्य.
पण आज वास्तव उलटं आहे.

जात जातींच्या भिंती अधिक मजबूत झाल्यात.
विवाह, प्रेम, संमती या संकल्पना अजूनही “जात उल्लंघन” म्हणून पाहिल्या जातात.
आणि सर्वात क्रूर म्हणजे, दलित, मागासवर्गीय, आदिवासी समाजातील युवक-युवतींना आजही जातीच्या नावावर प्राण गमवावे लागतात.
उच्चभ्रू, परदेशी, “लिबरल”… पण जात मात्र घरातून जात नाही
निरीक्षण असं की–
• परदेशात राहणारे, डॉक्टर–इंजिनिअर, शहरी उच्चभ्रू लोकसुद्धा आंतरजातीय विवाह करतात.
• पण त्यांची भारतात कोणीही चौकशी करत नाही… ते ‘मॉडर्न’ म्हणून मानले जातात.
पण एखाद्या गरीब, ग्रामीण, मागास समाजातील मुलगा-मुलगी प्रेम करतात?
त्याचं परिणाम बहुतेक वेळा
हिंसा
धमक्या
बहिष्कार
कधी थेट हत्या.
सक्षम ताटे ही याच विषारी मानसिकतेची बळी.
घोड्यावर बसणंही गुन्हा, चारचाकी घेणंही अहंकार?
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, या राज्यांतील बातम्या आपण रोज वाचतो.
दलित मुलाने घोड्यावर बसलं? मारहाण.
लग्नात बँड वाजवला? दंगली.
घर बांधलं? जळतं.
चारचाकी घेतली? अपमान.
आपण 5G कडे झेपावतो आहोत, पण अनेकांचं मन अजूनही मनुवादी 0G वर चालतं.
देशाच्या आदिवासी राष्ट्रपतींवर अत्याचारांची वेदना… पण मौनच का?
द्रौपदी मुर्मू – देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या आदिवासी महिला.
देशाला अभिमान आहे, पण
देशातील आदिवासी, दलित, मागास समाजावर होणाऱ्या अत्याचारांविषयी त्या कधी कठोर पणे बोलल्या नाहीत…
ही खंत समाजाच्या मनात खोलवर आहे.

राष्ट्रपती बदलल्या, पण राजकीय, सामाजिक हिंसेचं स्वरूप बदललं नाही.
सक्षम ताटे – एका तरुणाचं प्रेम, एका समाजाचा पराभव
त्या संध्याकाळी नांदेडच्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सक्षमच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, पण डोळ्यांत अजून स्वप्न होतं.
त्याला मारणारे कोण?
त्याच्या प्रेयसीचेच वडील आणि भाऊ.
प्रेमाने दोन माणसांना जोडायचं असतं.
पण इथे प्रेमाने एकतरुणाला नव्हे तर एका जातिभिमानाला धक्का दिला होता,आणि त्याची शिक्षा म्हणून त्याचा जीव घेतला गेला.
स्त्री सर्वात मोठी बळी, आंचल मामिडवारची वेदना
स्त्री अजूनही ‘स्वतंत्र मनुष्य’ म्हणून नव्हे, तर घराची अब्रू म्हणूनच जगते.
आंचलने प्रियकराच्या मृतदेहाशी प्रतीकात्मक विवाह केला.
ती म्हणते, “मी हरले नाही.”
पण वास्तव?
ती हरली.
समाज हरला.
व्यवस्था हरली.
कारण एक जिवंत प्रेमकथा मृतदेहाशी लग्न करून संपते… यापेक्षा मोठं अपयश काय असू शकतं?
कायदे पुरेसे नाहीत, त्यांचं अस्तित्व “मृत्यूनंतर” का जागं होतं?
एखाद्या जोडप्याला धमक्या आल्या की
पोलीस म्हणतात : “घरच्यांशी बोलून घ्या.”
संरक्षण दिलं तरी ते अपुरं, अर्धवट.
कारवाई मृत्यूनंतरच.
नातेवाईकांवर, साक्षीदारांवर दबाव.
राजकीय हस्तक्षेप.
वर्षानुवर्षं चालणारी न्यायालयाची घुसमट.
SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी कमकुवत.
Inter-caste marriage प्रोत्साहन योजना आहे, पण ती फक्त सरकारी पोर्टलवरच जास्त अस्तित्वात.
समाजाचा मौन हा देखील गुन्हाच
हत्याराने हत्या करणारा एकच असतो.
पण मौनाने हत्या करणारे शेकडो असतात.
शेजारी , “घरचा मामला” म्हणून गप्प.
गाव, “परंपरा” म्हणून आक्रमक.
पंचायत, बहुतेक वेळा दोषींना संरक्षण देणारी.
सोशल मीडिया, जातीय द्वेषाने पेटलेला.
ही मौनाची संस्कृतीच सर्वात क्रूर शस्त्र आहे.
समाधानाचा मार्ग कुठे?
कायदे आहेत, पण त्यांना मनुष्याच्या मनातील जात मोडता येत नाही.

आता प्रश्न एकच, आपण कोणाच्या बाजूने?
आज सक्षम ताटे नाही.
त्याची आई आयुष्यभर रडेल.
आंचलचं आयुष्य कधीच पूर्वीसारखं होणार नाही.
पण आपल्याकडे पर्याय आहेत.
आपण हा मृत्यू “दुर्दैवी घटना” म्हणून विसरणार आहोत?
की त्यातून शिकणार आहोत?
आपण कोणाच्या बाजूने उभे आहोत?
प्रेमाच्या की जातीच्या?
मुलांच्या की परंपरेच्या?
जिवंत भविष्याच्या की मृत परंपरेच्या?
जर आपण गप्प राहिलो, तर उद्या आणखी एक सक्षम…
आणखी एक आंचल…
आणखी एक उद्ध्वस्त कुटुंब…
या सडलेल्या परंपरेखाली दबून जाईल.
आणि मग आपण म्हणत राहू
“समाज बदलत नाही…”
पण बदलण्याची सुरुवात आपल्यालाच करायची आहे.


