पिंपरी–चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड पोलिस दलातील वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून हाकलण्यात आले आहे. दोन कोटींची लाच मागणी आणि लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी बडतर्फीचे आदेश जारी केले. “दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या कृत्यांविरुद्ध शून्य सहनशीलता” अशा शब्दांत पोलिसांनी ही माहिती दिली.
दामदुप्पटची आमिषे आणि पाच कोटींचा घोटाळा
शहरातील तब्बल ४० हून अधिक नागरिकांची “पैसे दुप्पट करून देतो” अशी आमिषे दाखवून चिंतामणीने सुमारे ५ कोटी रुपयांची मोठी फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. केवळ मौखिक पैशांची देवाणघेवाण नव्हे, तर ही रक्कम त्याने स्वतःच्या मेहुण्याच्या खात्यात जमा करून घेतल्याचेही उघड झाले. काही पीडितांकडून भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली होती.
लाच स्वीकारताना ACB ची कारवाई
२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रचलेल्या सापळ्यात चिंतामणी अडकला. दोन कोटींची मागणी करणाऱ्या PSI चिंतामणीला ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर झालेल्या घरझडतीत तब्बल ५१ लाखांची रोकड जप्त झाली. त्यावेळी चिंतामणी आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होता, हे विशेष.
शिस्तीचा धडा
लाचखोरी, आर्थिक गैरव्यवहार आणि पदाचा गैरवापर या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर चिंतामणीची सेवाबंदी जाहीर झाली. दलातील स्वच्छता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. पोलिस दलातील गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या धोरणाला चौबे यांचा निर्णय बळकटी देणारा ठरल्याचे निरीक्षण व्यक्त होत आहे.


