पुणे प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या असून, काही ठिकाणच्या स्थगित जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात पुण्यात मोठी ‘इनकमिंग’ पाहायला मिळाली.
पुण्यातील माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी संघटनेचे पुणे शहर उपाध्यक्ष अक्षय भोसले, मातंग एकता आंदोलनाच्या भारती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे राजेश परदेशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे श्रवण केकाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मशाल हाती घेत त्यांनी पुण्यातील राजकीय समीकरणांना नवा कल दिला.
या वेळी आमदार सचिन अहिर, शिवसेना संघटक वसंत मोरे, पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या प्रवेशामुळे पुण्यातील ताकद वाढल्याचा दावा पक्षाने केला आहे.
महापालिका निवडणूक दाराशी
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांची पडताळणी व दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी सर्वच पक्षांनी रणनीती आखण्याचा वेग वाढवला आहे. आणखी काही नेते, कार्यकर्ते पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेतही राजकीय वर्तुळात आहेत.
युती की स्वतंत्र लढत?
नगर परिषदांच्या निवडणुकांप्रमाणेच पुण्यातील लढतही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष यावेळी एकत्र राहणार का, की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार? यावरच पुढील राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे. स्वतंत्र लढती झाल्यास तिरंगी, चौरंगी संघर्ष अटळ ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
पुण्यातील अलीकडच्या इनकमिंगमुळे ठाकरे गटाने मात्र प्रारंभीपासूनच आपली तयारी मजबूत केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


