चिंचवड प्रतिनिधी
चिंचवडमध्ये सिरॅमिक दुकानदारावर कोयत्याने वार करून तब्बल ३ लाख ८० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने अखेर गाठलं. चार जणांच्या टोळीत तिघांना अटक तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री सुमारास दहाच्या सुमारास ही घटना घडली. दीपक नरसाना हे दुकान बंद करून दुचाकीजवळ उभे असताना त्यांच्या गाडीच्या पुढील भागात ठेवलेली पैशांची बॅग पाहून आरोपींपैकी एकाने अचानक धाव घेतली. त्याने कोयत्याने सलग तीन वार करत नरसानांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याच आरोपीने पैशांची बॅग आपल्या साथीदाराकडे फेकून दिली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसून आला आहे.
दीपक नरसाना यांनी तातडीने चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच गुंडाविरोधी पथकाने वेगाने तपास सुरू करत काही तासांतच आरोपींचा ठावठिकाणा शोधला. यश नरेश अंधारे, रितेश मुकेश चव्हाण, रूपेंद्र रूपबसंत बैद आणि एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या आरोपींपैकी रितेश चव्हाणवर आर्म्स अॅक्टअंतर्गत आधीच एक गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक झाल्यानंतर परिसरात वाढलेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने आरोपींची धिंड काढत नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या घटनेमुळे केशवनगर परिसरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.


