अहिल्यानगर प्रतिनिधी
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूचा पडदा अजूनही उलगडत नाही. मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतल्याप्रकरणी आत्महत्येची प्राथमिक नोंद असली, तरी ‘ही आत्महत्या नाही, आमच्या मुलीची हत्या आहे!’ असा ठाम आरोप गौरींच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

सोमवारी गौरी पालवे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर तालुक्यातील मोहोज–देवढे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याआधीच गावात तणावाची ठिणगी पडली. पालवे कुटुंबीयांनी
“आमच्या मुलीवर अत्याचार झाला, तिला त्रास देण्यात आला; म्हणूनच तिची चिताही अनंत गर्जे यांच्या घरासमोरच पेटली पाहिजे!”
असा आक्रोश करत थेट गर्जे यांच्या बंगल्यासमोर अंत्यसंस्कार करण्याचा आग्रह धरला.
यावर गर्जे कुटुंबीयांनी जोरदार आक्षेप घेतला आणि दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांत बाचाबाची, ढकलाढकलीचा प्रकार घडला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही पक्षांना शांत केले.
तणावपूर्ण वातावरणात शेवटी गर्जे यांच्या बंगल्याशेजारीच डॉ. गौरी पालवे यांच्या पार्थिवाला अग्निसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्कारानंतर गावात दाट शोककळा पसरली असली तरी तणावाचे सावट कायम आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.


