मुंबई प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आज पुन्हा एकदा अनुयायांची महासागरासारखी गर्दी उसळली. कालपासूनच लाखो अनुयायी या पवित्र स्थळी ओसंडून वाहत असून आज सकाळपासून मान्यवरांची उपस्थितीही लक्षणीय होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. याच वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदू मिल येथील स्मारकाबाबत महत्त्वाची घोषणा केली.
स्मारक पुढील ६ डिसेंबरपर्यंत!
इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या आंबेडकर स्मारकाचे काम पुढील वर्षी ६ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे. ४५० फूट उंचीचा डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा, आधुनिक सुविधांनी सज्ज परिसर, तसेच जागतिक स्तरावर ओळख मिळवू शकेल असे स्मारक उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
या स्मारकाचे भूमिपूजन ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर काही काळ कामाला विलंब झाल्याने अनुयायांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. मात्र सध्या काम वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा उल्लेख
फडणवीस यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांची आठवण करून दिली. नुकताच मुंबई दौऱ्यावर आलेल्या न्यू जर्सीच्या गव्हर्नरने अमेरिकेत वीजेअभावी निर्माण झालेल्या अडचणींवर चर्चा केली, याचा संदर्भ घेत त्यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
“अमेरिकेसारख्या प्रगत देशात आजही राष्ट्रीय वीज ग्रीडची संकल्पना नाही. मात्र बाबासाहेबांनी वीजमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारताच संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय ग्रीड उभारण्याचा निर्णय घेतला. आज भारतातील कोणत्याही भागातून दुसऱ्या भागात सहजपणे वीज पारेषण शक्य आहे, ते त्यांच्या दूरदृष्टीमुळे,” असे फडणवीस म्हणाले.
अनुयायांमध्ये उत्सुकता वाढली
सरकारने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार इंदू मिल स्मारक पुढील वर्षीच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त झाल्याने अनुयायांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा लागलेल्या या भव्य प्रकल्पावर अखेर गती येत असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.


