पुणे प्रतिनिधी
पिंपरी ताथवडे, शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक भान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास जपत इंदिरा विद्यापीठाने यंदा विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. ‘ओपनिंग हॉरिझोन्स’ या थीमवर आधारित प्रवेश मोहिमेच्या उद्घाटनानिमित्त विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात तब्बल ४१५ विद्यार्थ्यांना ४.१५ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. तरिता शंकर, शैक्षणिक सल्लागार व मुख्य विपणन अधिकारी प्रो. चेतन वाकलकर, कुलगुरू डॉ. अनघा जोशी, वित्त अधिकारी गिरीश पारेख, कार्यकारी संचालक शार्दुल गांगल, विश्वस्त साहिल तरिता शंकर, रजिस्ट्रार डॉ. प्रवीण पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री आठवले म्हणाले, “इंदिरा विद्यापीठाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारांशी सुसंगत आहे. समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाद्वारे सक्षम करण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे. दुबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात विद्यापीठाची शिफारस करावी, असा मनोदय आहे.” शिक्षण केवळ रोजगाराचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले.
संविधान, सामाजिक समता आणि विकसित भारत या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांमध्ये उर्जा निर्माण केली. कार्यक्रमाची रंगत वाढवताना त्यांनी सुरुवातीच्या भाषणात सलग एक तास इंग्रजीतून यमकबद्ध शैलीत संवाद साधून विद्यार्थ्यांना भुरळ घातली.
इंदिरा विद्यापीठाने यंदा सात प्रकारच्या शिष्यवृत्ती जाहीर केल्या आहेत.
• गुणवत्ता आधारित
• महिला विद्यार्थिनींसाठी
• दिव्यांगांसाठी
• आर्थिक दुर्बल घटकांसाठी
• खेळाडूंसाठी
• शहीदांच्या वारसांसाठी
• पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी
या शिष्यवृत्तींचे प्राथमिक वाटप सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देत करण्यात आले. “भारत चौथ्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचेल,” असे भाकीतही आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
इंदिरा विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आर्थिक दिलासा मिळणार असून उच्च शिक्षणातील संधी अधिक व्यापक होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


