पुणे प्रतिनिधी
कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील तब्बल ४० एकर जमिनीच्या संशयास्पद विक्री व्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीशी संबंधित या प्रकरणात कुलमुखत्यारधार आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.
तेजवानी यांच्या जबाबातून आणि जमा झालेल्या कागदपत्रांच्या छाननीत त्यांच्या सक्रिय सहभागाचे ठोस पुरावे मिळाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात ‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना देखील नोटीस बजावण्यात आली असून ते अद्याप पोलिसांसमोर हजर झालेले नाहीत.
जमिनीचा व्यवहार, सवलती आणि साखळी कागदपत्रांची चौकशी
या प्रकरणातील जमीन महार वतनाची असल्याचा तपासात उल्लेख आहे. २००६ साली शीतल तेजवानी यांनी एकूण २७५ जणांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली. त्यानंतर २०२५ मध्ये ‘अमेडिया’ कंपनीशी करार करून ही जमीन पुढे हस्तांतरित करण्यात आल्याचे उघड झाले.
जमिनीचा सुमारे ३०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती-तंत्रज्ञान पार्क उभारण्याच्या नावाखाली उद्योग संचालनालयाकडून इरादापत्र मिळवून मुद्रांक शुल्क सवलतीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरून राज्य सरकारकडून तब्बल २१ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क सवलत देण्यात आली होती.
आर्थिक गुन्हे शाखेने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, महसूल व मुद्रांक शुल्क विभागाकडून जमिनीची जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. या कागदपत्रांवरून संशयास्पद प्रक्रियेचे संकेत मिळाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सहा तासांची चौकशी आणि अटक
२० नोव्हेंबर रोजी पोलिसांनी शीतल तेजवानी यांची सलग सहा तास चौकशी केली. पॉवर ऑफ अॅटर्नी घेताना संबंधित व्यक्तींना मोबदला देण्यात आला होता का, हा मोबदला कशाच्या आधारे दिला, तसेच ‘अमेडिया’ कंपनीशी जमीन व्यवहार कोणत्या पद्धतीने झाला. या सर्व मुद्द्यांवर पोलिसांनी बारकाईने प्रश्नोत्तरे घेतली.
तपासात पुरावे आणि जबाबांमध्ये विसंगती आढळल्याने अखेर तेजवानी यांना अटक करण्यात आली. बावधन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा आधीच दाखल आहे.
कोरेगाव पार्कमधील या बहुमूल्य जमिनीच्या व्यवहारात नेमका गोंधळ काय आणि कोण कोण यात गुंतले आहे, याबाबत पुढील तपास निर्णायक ठरणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीमुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे आता समोर येण्याची शक्यता आहे.


