कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफोड प्रकरणात गुंतलेल्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. परीक्षेच्या आदल्याच रात्री उमेदवारांकडून लाखो रुपये व मूळ कागदपत्रे घेऊन प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणाऱ्या रॅकेटमधील चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य सुत्रधार महेश गायकवाड (सातारा) याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
ही कारवाई मुरगूड पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासातून उघडकीस आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये गुरुनाथ चौगले, किरण बरकाळे, अभिजित पाटील, रोहित सावंत हे चार शिक्षक असून, नागेश शेंडगे, राहुल पाटील, दयानंद साळवी, दत्तात्रय चव्हाण आणि अक्षय कुंभार यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीईटी उत्तीर्णतेची अनिवार्यता लक्षात घेऊन कागल व राधानगरी तालुक्यात ही टोळी सक्रिय होती. उमेदवारांकडून मूळ कागदपत्रे आणि तीन लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेऊन पेपर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले जात होते. दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे दोघे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या रात्री पेपरची छायांकित प्रत देत असत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
२३ नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षेच्या पूर्वसंध्येला सोनगे येथे उमेदवारांना बोलावून पेपर विक्रीची व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर व मुरगूडचे एपीआय शिवाजी करे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी शिवकृपा फर्निचर मॉलमध्ये टाकलेल्या धाडीत अटक आरोपींसह पाच विद्यार्थीही आढळले. छाप्यात विविध शिक्षण संस्थांची कागदपत्रे, कोरे धनादेश, प्रिंटर आदी एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पेपरफोडीच्या या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने टीईटी परीक्षेची शुचिता आणि सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, मुख्य सुत्रधाराचा शोध लागल्यानंतर या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


