स्वप्नील गाडे|रिपोर्टर
पनवेल : वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे अनधिकृतपणे पार्किंग करण्यात आलेल्या फॉर्च्युनरमधून पिस्तूल आणि संशयिताचे ड्रायव्हिंग लायसन्स आढळल्याने खांदेश्वर पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे. बनावट वाहन क्रमांकाचा वापर करत फिरणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी (दि. २) सायंकाळी सुमारे ८.३० वाजता नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरात वाहतूक निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक उपनिरीक्षक जीवन शेरखाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वाहतूक नियमनाचे काम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
वाहन क्रमांक संशयास्पद, तक्रारही दाखल
फॉर्च्युनर (MH 03 AH 7863) ही कार वाहतूक व्यवस्थेला अडथळा ठरत असल्याने पोलिसांनी गाडीच्या नंबरवरील मालकाला संपर्क साधला. मात्र, “हा वाहन क्रमांक माझा असला तरी ही गाडी माझी नाही. अज्ञात व्यक्ती माझ्या गाडीचा नंबर वापरत असून यासंदर्भात मी तक्रारही केली आहे,” असे सांगत मालकाने हात झटकला. यामुळे पोलिसांचा संशय गडद झाला.
पिस्तूल हाती, चालकाचे गुन्हे उघड
तपासणीदरम्यान कारचा समोरील दरवाजा अर्धवट उघडा आढळला. वाहनातून पिस्तूलसदृश शस्त्र मिळाले. तसेच ‘राजेंद्र निकम’ नावाचे ड्रायव्हिंग लायसन्सही सापडले. कोर्ट चेकर अॅपमधील पडताळणीने संबंधित व्यक्तीविरोधात मुंबई विभागात विविध गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
थोड्याच वेळात राजेंद्र निकम (४८, रा. चुनाभट्टी, मुंबई) घटनास्थळी पोहोचला. त्याला ताब्यात घेऊन वाहनासह खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन टीमकडे सोपविण्यात आले.
फॉर्च्युनरचा खरा मालक कोण? पिस्तूल कुठून आले?
फॉर्च्युनरचा मूळ मालक कोण? डुप्लिकेट नंबरचा उद्देश काय? वाहनातून मिळालेल्या शस्त्राचा वापर कोणत्या गुन्ह्यांसाठी झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


