पुणे प्रतिनिधी
पोलिस दलात भावाला नोकरी मिळवून देण्यासाठी थेट डमी उमेदवार बनून परीक्षा देणाऱ्या उपनिरीक्षकाची ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ शैलीतील फसवेगिरी अखेर नऊ वर्षांनी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी उपनिरीक्षकासह त्याच्या सख्या भावाविरोधात गुन्हा नोंदवून एकाला अटक केली आहे.
सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे आणि त्याचा भाऊ गजानन शिवलाल गुसिंगे (दोघे रा. कौचलवाडी, रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे, बनावट कागदपत्रांची निर्मिती व त्यांचा वापर, तसेच परीक्षांमधील गैरप्रकारास प्रतिबंधक कायद्यान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
२०१६ मधील परीक्षेत डमी म्हणून दिली लेखी परीक्षा
पुणे शहर पोलिस दलाच्या २०१६ मधील भरती प्रक्रियेत गजानन गुसिंगे सहभागी झाला होता. त्याने पाच आणि सहा एप्रिल रोजी मैदानी चाचण्या दिल्या होत्या. मात्र, २४ एप्रिलला असलेल्या लेखी परीक्षेला गजाननच्या जागी त्याचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग हजर झाला. या फसवणुकीसाठी त्यांनी बनावट ओळखपत्रे तयार केली होती. परीक्षा केंद्रावरील चित्रीकरणात दोघांमधील फरक दिसून आला आणि एका साक्षीदाराच्या विधानांवरून ही फसवणूक निश्चित झाली.
स्वतः फसवणूक करूनही २०२३ मध्ये झाला उपनिरीक्षक
तपासादरम्यान धक्कादायक माहिती उजेडात आली. डमी उमेदवार म्हणून परीक्षा देणारा सुप्पडसिंग स्वतःच काही वर्षांनी पोलिस दलात सामील झाला आणि २०२३ मध्ये त्याची उपनिरीक्षक म्हणून नेमणूकही झाली. पोलिस महासंचालक कार्यालयातून खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेने राज्य राखीव दल गट क्रमांक सात मधून त्यास ताब्यात घेतले.
उपनिरीक्षक कोठडीत; गजाननचा शोध सुरू
दोघांनी बनावट कागदपत्रे कुठे आणि कशी तयार केली, याचा तपास सुरु आहे. यासाठी आरोपी सुप्पडसिंगला कोठडीची मागणी सरकारी पक्षाने केली. बचाव पक्षाने आक्षेप मांडला असला, तरी न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दरम्यान, आरोपी गजानन फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
पोलिस भरतीतील गैरप्रकारांच्या मालिकेत हे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, यामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


