पुणे प्रतिनिधी
राज्यातील वाहनधारकांना दिलासा देत परिवहन विभागाने ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ जाहीर केली आहे. राज्यातील २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी एचएसआरपी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही निर्णयप्रक्रिया महत्वाची ठरली आहे. आता वाहनधारकांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत मिळणार आहे.
परिवहन आयुक्तांनी ही मुदतवाढ अंतिम असल्याचे स्पष्ट करत, नियोजित कालावधीनंतर एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना दिली आहे.
पुण्यात सुमारे २५ लाखांहून अधिक वाहनांना एचएसआरपी बसविण्याची आवश्यकता असून, अद्याप केवळ साडेसात लाख वाहनांवरच या प्लेट बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. कामाचा वेग अपेक्षेप्रमाणे न वाढल्याने वाहनधारकांत अडचणी निर्माण होत होत्या. नंबर प्लेट बसविण्याची जबाबदारी एका कंपनीकडे दिल्यानंतर वाढत्या वाहनसंख्येनुसार प्रक्रिया मंदावल्याचे अधिकारी सांगतात.
वेळेत एचएसआरपी मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून सर्व स्तरांतून मुदतवाढीची मागणी होत होती. त्यानुसार परिवहन विभागाने मुदत वाढवून तत्काळ दिलासा दिला असला, तरीहि अंतिम मुदत असल्याने वाहनधारकांनी विलंब न लावता एचएसआरपी बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


