
कराड:प्रतिनिधी
डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीचा जागीच मृत्यू झाला. पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूर नाका येथे आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. सोनिया अविनाश कांबळे (वय २२ रा. नेहरूनगर, शनिवार पेठ, कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्या युवतीचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोनिया कांबळे ही युवती येथील वैद्यकीय महाविद्यालयात बीडीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पान ७ वर महाविद्यालयातून ती दुचाकीवरून (एमएच ५० के ०८१०) कऱ्हाड येथे घरी जात होती. पुणे- बंगळूर महामार्गावर कोल्हापूर नाका येथे आली असता डंपरने (एमएच १७ बीवाय ७०४१) दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
धडक देऊन युवतीसह दुचाकीला फरपटत नेले. या अपघातात युवती गंभीर जखमी झाली. अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांसह वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच अपघात विभागाचे हवालदार धीरज चतुर व महाले अपघातस्थळी दाखल झाले.
तोपर्यंत नागरिकांनी व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित युवतीला गंभीर जखमी अवस्थेत नजीकच असलेल्या रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीय व सोनियाच्या मित्र-मैत्रिणींनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.