स्वप्नील गाडे| रिपोर्टर
ठाणे : देसाई गाव खाडी पुलाखाली ट्रॉली बॅगेत सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या खुनाचा गुन्हा फक्त २४ तासांत उघडकीस आणत शिळ-डायघर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. घरगुती वादातून महिलेला गळा दाबून ठार मारल्याची आरोपीने कबुली दिली आहे.

२२ वर्षांची प्रियांका विश्वकर्मा ही आरोपी विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०) याच्यासोबत मागील पाच वर्षांपासून राहात होती. २१ नोव्हेंबरच्या रात्री दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्या भरात आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत ट्रॉली बॅगेत भरून एक दिवस बंद खोलीतच ठेवले. दुर्गंधी पसरू लागल्यानंतर २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुलावरून बॅग खाडीमध्ये फेकून आरोपी घराकडे परतला.
पाणथळ भागात बॅग पडलेली दिसल्याची माहिती ठाणे नियंत्रण कक्षाकडून मिळताच शिळ-डायघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. २० ते २५ वर्षे वयाच्या महिलेचा अर्धवट कुजलेला मृतदेह ट्रॉली बॅगेतून आढळला. डाव्या हातावर ‘P.V.S.’ असे गोंदलेले नाव आणि सीसीटीव्ही फुटेज ही पोलीस तपासातील महत्त्वाची धागेदोरे ठरले.
सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातमीच्या माध्यमातून एका साक्षीदाराने पोलिसांना संपर्क साधत महत्त्वाची माहिती पुरवली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितींचा मागोवा घेत तपास पथकाने आरोपी विनोद विश्वकर्मा याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
वेगवान तपास आणि तात्काळ कारवाईमुळे गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उकलण्यात पोलिसांना यश मिळाले.
ही कामगिरी सुभाषचंद्र बुरसे, प्रशांत कदम, प्रिया डमाळे, श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र राऊत, संतोष चव्हाण, अनिल राजपूत, योगश लामखडे, शहाजी शेळके, अमोल पोवार, माने, बेलगे, तिडके, श्यामकुमार राठोड, हनुमंत मोरे, भरत जाधव, तेजस परब, विश्वास मोटे, महेंद्र लिंगाळे, सचिन कोळी, अजय साबळे, रमेश पाटील, विकांत कांबळे, मंदार यादव, महेंद्र पाटील, संदीप बोरकर, सुशिल पवार, ललीत महाजन, जयेश येळवे, रत्नदिप चौधरी, अक्षय पाडळे, स्वप्निल सोनवलकर, वाहीद तडवी, विजय खाडे यांनी केली आहे.


