स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : वाकोला पोलीस ठाणे हद्दीतून पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुंबई पोलिसांनी केवळ दोन दिवसांत गुन्हा उकलत मुलीला सुखरूप आईकडे परत आणले आहे.
२२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या ५ वर्षीय मुलीचे कायदेशीर रखवालीतून अपहरण केल्याची तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात दाखल झाली. गुन्हा अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने आणि अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असल्यामुळे परिमंडळ ८ मधील गुन्हे प्रकटीकरण पथकांची सात विशेष पथके तातडीने तयार करण्यात आली.
तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित ऑटोरिक्षाचा शोध घेतला. ही रिक्षा पनवेलपर्यंत गेल्याचे समोर आले. तपासात उघड झाले की मध्यरात्री २ ते ३ या वेळेत एक पुरुष, एक स्त्री आणि रिक्षाचालक अपहृत मुलीला घेऊन गेले होते. याचवेळी एक मोटारसायकलस्वार आणि आणखी दोन संशयित टेहळणीसाठी परिसरात फिरत होते.
रिक्षाचा क्रमांक नसल्याने आव्हान अधिक होते. मात्र पोलिसांनी मिळालेल्या वर्णनावरून संशयित रिक्षाचालक लतीफ अब्दूल माजिद शेख याला वाकोला–सांताक्रूज परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मुलीचे अपहरण तिचे मामा लॉरेन्स फर्नांडिस आणि मामी मंगल जाधव यांनी केल्याचे उघड केले. पनवेलमध्ये या दोघांना पकडून पुढील चौकशीत त्यांनी करन मारुती सनस याला ९० हजार रुपयांना ही मुलगी विकल्याची कबुली दिली.
त्यानंतर उसर्ली बुद्रुक, नवी पनवेल येथून करन सनसला अटक करण्यात आली. त्याने मुलीची दुसऱ्यांदा १ लाख ८० हजार रुपयांना विक्री करून ती वृंदा विनेश चव्हाण व अंजली कोरगावकर यांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. पनवेल येथील वृंदा चव्हाण यांच्या घरातून मुलीला सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
• या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी
लतीफ अब्दूल माजीद शेख (रिक्षाचालक), लॉरेन्स निकलेस फर्नांडिस, मंगल दगडू जाधव, करन मारुती सनस आणि वृंदा विनेश चव्हाण.
मुंबई पोलिसांनी अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा वेगाने तपास करून केवळ मुलीला सुरक्षित परत आणले नाही, तर संपूर्ण अपहरण,विक्री रॅकेटच उघड केले.
ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर आयुक्त परमजितसिंह दहिया, उप आयुक्त मनीष कलवानिया, सहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर तसेच निरीक्षक खराडे, वैभव स्वामी, सपोनि महेश्वर तळेकर, कदम, चौधरी, बनकर, लोंढे, बागल, दौंडकर, ठोसर, सुवे, डोळे, माळी, गुट्टे, बंडगर, बडगुजर, सुनिता घाडगे, चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अमंलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


