सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर काही अपक्ष उमेदवारांनी पक्षाशी साधर्म्य दाखवणारे प्रचार तंत्र अवलंबल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, पक्षाने अधिकृत एबी फॉर्म न दिलेल्या काही इच्छुकांनी आपापल्या प्रचार साहित्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय ते जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे वापरल्याचा प्रकार समोर आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सोमवारी कठोर शब्दांत इशारा दिला. “अधिकृत उमेदवारांशिवाय कोणालाही भाजपचे नाव, पक्षचिन्ह किंवा पक्षनेत्यांची छायाचित्रे वापरण्याची परवानगी नाही. नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार आणि पक्षाच्या शिस्तभंगप्रक्रियेने कठोर कारवाई केली जाईल,” असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
भोसले म्हणाले, काही उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करूनही प्रचार साहित्यामध्ये पक्षाशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रकार पक्ष धोरणाविरुद्ध असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारा असल्याने तो तातडीने थांबवावा, अशी सूचना त्यांनी केली.
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनाच वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे, पक्षचिन्ह व अन्य प्रचारक साहित्य वापरण्याचा अधिकार असून बाकी कोणतीही कृती ही “भ्रामक प्रचार” मानली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. “असा प्रकार आढळल्यास कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तत्काळ जिल्हा कार्यालयाला कळवावे,” असे आवाहनही त्यांनी पक्ष संघटनांना केले.
निवडणुकांच्या तोंडावर अपक्ष उमेदवारांकडून पक्षाची प्रतिमा वापरण्याचे प्रकार वाढू नयेत, यासाठी भाजपकडून स्पष्ट आणि कडक भूमिका घेण्यात आली असल्याचे पक्षवर्तुळात सांगितले जात आहे.


