कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील पाचगाव परिसरात दडलेला कौटुंबिक कलह भीषण वळण घेत पतीच्या खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या व्यसनाने ग्रस्त शामराव यांच्या वारंवारच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच बहिणीच्या मुलामार्फत पाच जणांना ‘सुपारी’ दिल्याचे तपासात समोर आले. राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे 18 जुलैच्या रात्री या पाच जणांनी शामरावचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून नदीत टाकला. सर्व पुरावे पुसल्याचे अपराध्यांना वाटत असताना तासगाव पोलिसांनी एका बनावट नंबर प्लेटच्या धाग्याने संपूर्ण कट उघड केला.
अत्याचाराला कंटाळून घातक निर्णय
शामराव यांच्या दारूच्या नशेत सततच्या शिवीगाळ व मारहाणीमुळे त्रस्त झालेल्या पत्नीने अखेर बहिणीच्या मुलाशी संपर्क साधला. ‘या माणसाचा कायमचा बंदोबस्त कर,’ अशी विनवणी करत तिने गुन्ह्याचे बीज रोवले. पैशांचे आमिष दाखवून या तरुणाने निपाणी, तासगाव आणि सांगली येथील चार मित्रांना एका टोळीत गोळा केले. डान्स ग्रुपमधून मैत्री झालेल्या 20 ते 25 वयोगटातील या पाच जणांनी पैशांसाठी गुन्ह्याचा मार्ग स्वीकारला.
शेतात घेऊन जाऊन खून, मृतदेहाची विल्हेवाट
18 जुलैच्या रात्री शामरावला आमिष दाखवून गुडाळ येथे बोलावण्यात आले. शेताच्या आडोशाला नेऊन सर्वांनी मिळून त्याला प्रथम बेदम मारहाण केली आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला. मृतदेह पोत्यात भरून तिन्ही दुचाकींवरून हे पाचही जण निपाणीच्या दिशेने रवाना झाले. यमगर्णीजवळील नदीत पोते फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर तासगावातील एका तरुणाने शामरावची दुचाकी गावातच वापरायला ठेवली. दरम्यान, 25 जुलै रोजी पत्नीने पती बेपत्ता असल्याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात केली. दुसऱ्याच दिवशी निपाणी ग्रामीण पोलिसांना नदीपात्रात सापडलेला मृतदेह शामरावच असल्याचे स्पष्ट झाले. गळा आवळण्याच्या खुणा असूनही प्रकरण आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदल्याने तपासाला सुरुवातीला गती मिळाली नाही.
बनावट नंबर प्लेटने पोलिसांचा धागा पकडला
तपासाला महत्त्वाचा वेग 30 जुलैला मिळाला. तासगाव पोलिस गस्त घालत असताना भिलवडी नाक्यावर संशयास्पद तरुण दुचाकीसह आढळला. कागदपत्रांबाबत उडवाउडवीची उत्तरे आणि बनावट नंबर प्लेट पाहताच पोलिसांनी चौकशी कडक केली. प्रत्यक्षात मूळ नंबर तपासल्यावर ती दुचाकी मृत शामरावची असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.
खोलवर चौकशी करताच या तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली आणि गुडाळ येथील खुनापर्यंत संपूर्ण गुंता उलगडला. पत्नीनेच कट रचून बहिणीच्या मुलासह पाच जणांकडून खून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.
तरुणांचे आयुष्य अंधारात; पोलिसांचा वेधक तपास
डान्स ग्रुपमधील मैत्री, चुकीची संगत आणि पैशांचा मोह यामुळे पाच तरुणांनी स्वतःचे आयुष्य गुन्हेगारीच्या अंधारात ढकलले. ही संपूर्ण साखळी उलगडण्यात तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने निर्णायक भूमिका बजावली. उपनिरीक्षक प्रदीप चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याचा धांडोळा घेत सर्व आरोपींना गजाआड केले.
तासगाव पोलिसांनी बनावट नंबर प्लेटचा धागा पकडला नसता, तर हा खून आजही रहस्याच्या गर्तेतच राहिला असता. दुचाकीपासून सुरू झालेला तपास अखेर राधानगरीतील खुनापर्यंत पोहोचला आणि पतीच्या खुनाचा हा थरारक कट उघड झाला.


