मुंबई प्रतिनिधी
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत असून, गौरीने घेतलेला गळफास हा आत्महत्येचा प्रकार नसून ‘संशयास्पद मृत्यू’ असल्याचा ठाम दावा नातेवाईकांनी केला आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणी चौकशीला सुरुवात केली असून, अनंत गर्जेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरीच्या नातेवाईकांच्या मते, गेल्या दोन महिन्यांपासून पती–पत्नीमध्ये वाद वाढले होते. अनंत गर्जे यांचे एका दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे गौरीला समजल्यावर दोघांमध्ये सतत वाद होत होता. गौरीन पतीला समजावले आणि क्षमा देखील केली, मात्र त्यानंतरही त्या महिलेबरोबरचे चॅटिंग थांबले नसल्याचे आरोप मामांनी केले.
गौरीच्या मामांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आणखी गंभीर आरोप केला. “भांडणाच्या वेळी अनंत गर्जेने स्वतःच्या हातावर ब्लेडने वार केले आणि ‘मी पण मरेन आणि तुला देखील यात गुंतवेन’ अशी धमकी दिली. गौरी ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वडिलांकडे महत्त्वाचे पुरावे?
फेब्रुवारी २०२४ मध्ये अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह बीड येथे मोठ्या थाटामाटात झाला होता. या लग्नासाठी गौरीच्या घरच्यांनी ५० ते ६० लाख रुपये खर्च केले होते. पंकजा मुंडेही या विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या.
विवाहानंतर काही महिन्यांतच गौरीला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती मिळाली. तिने हा प्रकार आई–वडिलांना सांगितला. मात्र नातेसंबंध टिकावेत या भावनेतून घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे नातेवाईक सांगतात. गौरीच्या वडिलांकडे अनंत गर्जे आणि संबंधित महिलेतील चॅटिंगचे पुरावे असल्याचाही गौरीच्या मामांचा दावा आहे.
दरम्यान, पोलिस या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करीत असून, मृत्यूची नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे.


