कोल्हापूर प्रतिनिधी
स्वप्नं मोठी होती, पण काळाने क्षणात सगळं हिसकावून घेतलं. सोन्यावर कलाकारी करण्याचं स्वप्न उराशी बाळगून सोनार व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या २३ वर्षीय विशाल संजय आडनाईक (रा. खुपीरे) या तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. दिवाळीच्या सणासुदीच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने खुपीरे परिसरात शोककळा पसरली आहे.
विशाल हा मुळचा सोनार कामावर प्रेम करणारा तरुण. वडील संजय आडनाईक हे कुंभी कासारी साखर कारखान्यात कामगार प्रतिनिधी असून, ते स्वतः सोनार कामही करत असत. मुलाला सोन्याच्या व्यवसायाची ओढ पाहून त्यांनी त्याला प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. काही महिन्यांच्या मेहनतीनंतर दीपावलीच्या शुभमुहूर्तावर विशालने स्वतःच्या सोनार दुकानाचा शुभारंभ केला.
गावातील मंडळी, नातेवाईक, मित्र परिवार, सगळ्यांच्या उपस्थितीत थाटामाटात झालेले उद्घाटन पाहून विशालचा आनंद ओसंडून वाहत होता. आईवडिलांच्या डोळ्यांत अभिमान दाटला होता. पण या आनंदाला दुसऱ्याच दिवशी काळाने गाठलं.
गुरुवारी सकाळी विशाल आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. काही क्षणांतच रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. बाथरूममध्ये पडल्याचा आवाज येताच घरच्यांनी धाव घेतली. पण तेव्हा पर्यंत त्याला उठवताही येत नव्हतं. तातडीने कोल्हापुरातील खाजगी
नेलं असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
आशा आणि स्वप्नांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाचा मृत्यू ऐन दिवाळीत झाल्याने गावभर हळहळ व्यक्त होत आहे. व्यवसायाची पहिली पायरी चढण्याआधीच जीवन संपलं. घरातील आई-वडिलांचा हंबरडा, मित्रांच्या डोळ्यांत अश्रू, आणि संपूर्ण खुपीरे गाव शोकसागरात बुडालं.
विशालच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.


