पुणे प्रतिनिधी
स्वार्थाच्या गर्दीतही माणुसकीचा दिवा तेजाने प्रज्वलित करणारी घटना पुण्यातील सदाशिव पेठेत घडली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कचरावेचून करणाऱ्या अंजू माने यांनी रस्त्यावर कचऱ्यात सापडलेली तब्बल दहा लाख रुपयांची पिशवी प्रामाणिकपणे मालकाकडे सुपुर्द केली. आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीतही प्रामाणिकतेचा मार्ग निवडत अंजूताईंनी समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
सदाशिव पेठेतील विविध गल्लीबोळांत गेल्या वीस वर्षांपासून अंजूताई कचरा संकलनाचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे सकाळी कचरा गोळा करत असताना संकलन केंद्राजवळील रस्त्यावर त्यांना एक मोठी पिशवी दिसली. औषधांच्या दुकांनांची गल्ली असल्याने औषधांची पॅकेटं चुकून पडण्याच्या घटना नेहमीच्या. त्यामुळे ‘मालक शोधत येईल’ या समजुतीने त्यांनी पिशवी संकलन केंद्रात ठेवली.
नंतर पिशवी उघडून पाहिल्यावर आत औषधांसोबत मोठी रोख रक्कम असल्याचे दिसताच अंजूताईंना क्षणभर धक्का बसला. इतकी मोठी रक्कम हरवलेल्या व्यक्तीची अवस्था काय असेल, याचा विचार करत त्यांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. नागरिकांच्या मदतीने चौकशी सुरू असतानाच रस्त्यावर काही तरी हरवले असल्यासारखे शोधत असलेली व्यक्ती त्यांच्या नजरेस पडली.
अस्वस्थ अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला अंजूताई व सहकाऱ्यांनी जवळ घेतले, पाणी दिले आणि शांत केले. चौकशीअंती पिशवी त्यांचीच असल्याचे स्पष्ट होताच अंजूताईंनी पूरेपूर दहा लाख रुपये आणि औषधांसह ती पिशवी त्यांच्या हवाली केली. अनोळखी व्यक्तीकडून इतकी रक्कम सुरक्षित परत मिळाल्याने त्या व्यक्तीने भावूक होत अंजूताईंचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एक साडी व थोडी रोख रक्कम देऊन परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.


