स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई : वसईतील शिक्षिकेच्या मारहाणीमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सांताक्रूझच्या कलिना परिसरातील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्येही तसाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दहावीतील १५ वर्षीय विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी वाकोला पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचा कुर्ला येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बालदिनानिमित्त कार्यक्रमातही अरेरावी
शाळेत १३ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त कार्यक्रम होता. विद्यार्थीदेखील उपस्थित होता. त्यावेळी मुख्याध्यापकांनी त्याला ‘वर्तन बेशिस्त आहे’ असा दम भरत वर्गात बसून राहण्याचे आदेश दिले आणि पालकांना तातडीने बोलवण्यास सांगितले. मात्र पालक तत्काळ येऊ न शकल्याने मुख्याध्यापकांनी संतापाच्या भरात विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
‘मी वकील आहे, जिथे जायचे तिथे जा,’ ‘कुटुंबीयांचा दावा
सोमवारी विद्यार्थ्याची आई व नातेवाईकांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला असता त्यांनी “मी वकील आहे, जिथे जायचं तिथे जा” असा अरेरावीचा पवित्रा घेतल्याचे कुटुंबीयांनी तक्रारीत नमूद केले आहे. विद्यार्थ्याच्या चुलत भावाने मागणी करून फुटेज पाहिले असता संपूर्ण मारहाणीचा प्रकार स्पष्टपणे आढळला.
यानंतर कुटुंबीयांनी वाकोला पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


